जिल्हाधिकाऱ्यांकडून काँग्रेसच्या आंदोलनाची तत्काळ दखल
By admin | Published: June 21, 2017 12:24 AM2017-06-21T00:24:51+5:302017-06-21T00:24:51+5:30
चार लाखांची तरतूद : लीज लाइन सर्किटचे काम सुरू करण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मालवण : मालवणातील विद्यार्थ्यांचे दाखल्यांअभावी शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधत कार्यवाही करण्याच्या केलेल्या सूचनांची जिल्हाधिकारी यांनी तत्काळ दखल घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दूरसंचार विभागाला तहसील कार्यालयातील इंटरनेट समस्या दूर करण्यासाठी लीज लाइन सर्किटच्या कामाला बुधवारपासून सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत.
तहसील कार्यालयातून दाखले वितरीत होण्याची कार्यवाही होत नसल्याने काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांना धारेवर धरत ठिय्या आंदोलन केले होते. दुसऱ्याच दिवशी काँग्रेसने छेडलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. दाखल्यांच्या समस्येसंदर्भात काँग्रेस जिल्हा पदाधिकाऱ्यांसह, जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेत लक्ष वेधले होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच दूरसंचार विभागाचे पी. आर. खवणेकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
तहसील कार्यालयातील इंटरनेटची समस्या दूर करण्यासाठी बुधवारपासून तत्काळ लीज लाइन सर्किटचे काम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ४ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.