रत्नाकर गायकवाडला तत्काळ अटक करा

By admin | Published: July 8, 2016 11:01 PM2016-07-08T23:01:24+5:302016-07-09T00:47:00+5:30

कणकवलीत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा : आंबेडकरप्रेमींकडून आयोजन, मुंबईतील घटनेचा निषेध

Immediately arrest Ratnakar Gaikwad | रत्नाकर गायकवाडला तत्काळ अटक करा

रत्नाकर गायकवाडला तत्काळ अटक करा

Next

कणकवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ऐतिहासिक वास्तुमधून बहुजन समाजाची स्वाभिमानी चळवळ चालविली तसेच बुध्दभूषण प्रिंटिंग प्रेस मधून जनता, प्रबुध्द भारत, मूकनायक अशी नियतकालिके काढली तीच वास्तु उध्वस्त करण्यात आली आहे. त्यामुळे एकप्रकारे हा बाबासाहेबांच्या चळवळीवर चढविलेला हल्ला आहे. हे कृत्य करणाऱ्या रत्नाकर गायकवाड़ व त्यांच्या सहकाऱ्यांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करीत सिंधुदुर्गातील आंबेडकरप्रेमी जनतेने शुक्रवारी कणकवली शहरातून प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
दरम्यान, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थनगर येथून सुरु झालेला हा मोर्चा बाजारपेठमार्गे प्रांताधिकारी कार्यालयाजवळ पोहचल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जनसमुदायाला संबोधित केले. तसेच त्यानंतर शिष्टमंडळाने प्रांताधिकारी संतोष भिसे यांची भेट घेऊन शासनाला आपल्या भावना कळवाव्यात यासाठी निवेदन सादर केले.
या मोर्चात भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष नाना डामरेकर, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद कांबळे, तानाजी कांबळे, विश्वनाथ कदम, भीकाजी वर्देकर, विजय कासार्डेकर, मिलिंद जाधव, सुदीप कांबळे, डी. के. पडेलकर, जनीकुमार कांबळे, भगवान कदम, महेंद्र कदम, संजय पेंडूरकर, रवींद्र पवार, पी. डी. कदम, श्यामसुंदर वराडकर, दिगंबर पावसकर, सूर्यकांत कदम, नरहरी कांदळगावकर, महेश परुळेकर, विजय वळंजू , प्रकाश करुळकर, उत्तम जाधव, रमाकांत जाधव, जयप्रकाश जाधव आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आंबेडकर प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
मुंबईतील ‘ती’ घटना घडल्यानंतर प्रसिद्धी माध्यमातून आंबेडकर परिवाराची बदनामी करणाऱ्यांना कधीही माफ केले जाणार नाही. त्याच बरोबर सुरु करण्यात आलेले हे जनआंदोलन आता गद्दारांना नष्ट केल्याशिवाय थांबवायचे नाही. असा निर्धार ही यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरप्रेमी जनतेच्या मनातील संतापाला यावेळी वाट मोकळी करून दिली.
या मोर्चात भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, रिपब्लिकन सेना, बहुजन समाज पार्टी, भारतीय बौद्ध महासभा, कणकवली महाल बौध्द विकास संघ, वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ, देवगड तालुका बौध्दजन सेवा संघ, बौध्दजन सेवा संघ खारेपाटण, सिंधुदुर्ग जिल्हा बौद्ध हितवर्धक महासंघ, मालवण तालुका बौद्ध सेवा समिती, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सत्यशोधक संघर्ष समिती अशा अनेक संघटनांबरोबरच परिवर्तनवादी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)


कडक पोलिस बंदोबस्त !
या मोर्च्याच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली होती. नेहमीच्या पोलिस बळा बरोबरच पोलिस निरीक्षक सुनील मोरे यांच्या नेतृत्वाखाली ९ अधिकारी तसेच ६० कर्मचारी असा कडक बंदोबस्त शहरात ठेवण्यात आला होता.


...अन्यथा आंदोलन तीव्र करणार
रत्नाकर गायकवाड आणि बोगस ट्रस्टी यांच्यावर राष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा गुंडांची मदत घेऊन नष्ट केल्याप्रकरणी देशद्रोहाचा फौजदारी गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी. पीपल इंप्रूव्हमेंट ट्रस्टवर गैरमार्गाने बोगस ट्रस्टिनी घेतलेला ताबा तातडीने सोडावा. तसेच हा ट्रस्ट व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या देशभरातील इतर ट्रस्टवर आंबेडकर कुटुंबातील सदस्य असावेत. आंबेडकर भवनाचे पुनर्निर्माण लोकवर्गणीतून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील ट्रस्टच्या माध्यमातूनच व्हावे. अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. तसेच या मागण्यांची पूर्तता शासनाने तातडीने करावी अन्यथा आम्हाला आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल.असा इशाराही प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

कार्यकत्यांकडूनजोरदार घोषणाबाजी
कणकवली बसस्थानकाशेजारील बुद्धविहार येथे मोर्चा आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच मोर्चात सहभागी झालेल्यांकडून ‘रत्नाकर गायकवाडला अटक झालीच पाहिज’, ‘गली मे शोर है, रत्नाकर गायकवाड चोर है’, ‘अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’,‘हल्ला बोल, हल्ला बोल’अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

Web Title: Immediately arrest Ratnakar Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.