दुर्गामातेच्या मूर्तींचे विसर्जन
By admin | Published: October 23, 2015 09:38 PM2015-10-23T21:38:45+5:302015-10-24T00:45:38+5:30
कणकवलीत भक्तीमय वातावरण : ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी
कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी ठिकठिकाणी श्री दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.
नवरात्रोत्सवातील नऊ दिवसांमध्ये श्री दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा पारंपरिक पद्धतीने केली जाते. प्रत्येक ठिकाणी परंपरेप्रमाणे यात बदल दिसून येतो. मात्र सर्वसाधारणत: नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीचि, पुढील तीन दिवस रजोगुण वाढविण्यासाठी महालक्ष्मीची तर शेवटचे तीन दिवस सत्वगुणी महासरस्वतीची पूजा केली जाते. नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केल्यानंतर श्री दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन करुन या उत्सवाची सांगता करण्यात येते.
कणकवली शहरात राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, बाजारपेठ मित्र मंडळ, गोंधळी समाज बांधव यांच्यासह आणखीन काही मंडळांनी श्री दुर्गा देवीची विधिवत प्रतिष्ठापना केली होती. तर काही ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना न करता दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. कलमठ महाजनीनगर येथील वृंदावन सभागृहात गुजराथी पाटीदार समाजाने दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला. (वार्ताहर)
नवरात्रोत्सवाची सांगता : पोलीस बंदोबस्त
जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची धूम गेले नऊ दिवस सुरु होती. विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्त करण्यात आले होते. श्री दुर्गा देवीच्या मूर्तीच्या विसर्जनानंतर या उत्सवाची सांगता झाली. विसर्जन मिरवणुकीलाही मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरु होत्या. जानवली तसेच गडनदीवरील गणपती सान्यावर मूर्ती विसर्जन करण्यात आले.