सिंधुदुर्ग पॅटर्न राज्यभर राबवून राज्यही शिक्षणात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील- दीपक केसरकर
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 15, 2022 01:55 PM2022-08-15T13:55:06+5:302022-08-15T13:59:12+5:30
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त येथील पोलीस परेड ग्राऊंडवर शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा हा गेली १२ वर्ष १० वी आणि १२ वीच्या निकालामध्ये अग्रेसर आहे. हा जिल्हा हुशार विद्यार्थ्यांचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील हा शिक्षणाचा पॅटर्न राज्यभर राबविल्यास महाराष्ट्र शिक्षणाच्या क्षेत्रात नक्कीच अग्रेसर राहील आणि त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त येथील पोलीस परेड ग्राऊंडवर शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, पद्मश्री परशुराम गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा देऊन शालेय शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले, देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व कायम राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुया. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत घरो घरी तिरंगा या उपक्रमात जिल्हावासियांनी सक्रीय सहभाग घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. हा महोत्सव साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील प्रशाकीय अधिकारी, कर्मचारी यांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे.
क्रीडा क्षेत्रातही जिल्ह्यातील सिंधुकन्यांनी जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. त्यांचेही मी अभिनंदन करतो. आज या निमित्ताने आपल्यामधील बंधुभाव अधिक दृढ करण्याचा निश्चय आपण करूया. सुरुवातीस परेड कमांडर रामदास पालशेतकर यांनी ध्वजास व उपस्थितांना मानवंदना दिली. त्यानंतर जिल्ह्यातील वीर माता व वीर पत्नी यांना गौरविण्यात आले. त्यामध्ये प्रभावती गावडे, सविता कदम, रोजलीन रॉड्रीक्स, मिनाक्षी शेडगे आणि तिलोत्तमा सावंत यांचा प्रातिनिधीत गौरव करण्यात आला. तर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातर्फे राबवण्यात आलेल्या ड्रोन सर्वेची सनद सावंतवाडी तालुक्यातील फणसवडे गावाला देण्यात आली.
स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ मिळालेल्या देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा इळये नं. १ व सावंतवाडी तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली या शाळांचाही गौरव करण्यात आला. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा रुग्णालय व संजिवनी बाल रुग्णालय, सावंतवाडी या रुग्णालयांचाही सन्मान याप्रसंगी करण्यात आला. तर भुवनेश्वर, ओरिसा येथील राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धांमध्ये कनिष्ठ गटात रौप्य पदक विजेत्या पुर्वा संदीप गावडे हिचाही यावेळी गौरव करण्यात आला.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी जिल्हा मुख्यालयामध्ये उपोषणास बसलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना प्रशासनास केल्या. त्यानंतर महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने घेतलेल्या सागरी किनारा स्वच्छ मशिनचे उद्घाटन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीचेही उद्घाटन मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.