महिलांना पालखी नाचविण्याचा मान
By admin | Published: April 7, 2016 11:36 PM2016-04-07T23:36:51+5:302016-04-07T23:57:11+5:30
राजापूर तालुका : जैतापूरमधील ग्रामस्थांनी दिला समानतेचा संदेश
जैतापूर : संपूर्ण राज्यभर महिलांच्या मंदिर प्रवेशाबद्दल चर्चा सुरू असताना राजापूर तालुक्यातील जैतापूर गावात ग्रामस्थ, ट्रस्टचे पदाधिकारी व मानकऱ्यांनी पालखी नाचवण्याचा मान महिलांना दिला. महिलांनी खांद्यावर पालखी घेऊन ती नाचविण्याचा आनंद लुटला. महिलांना पालखी नाचविण्याचा मान देऊन ग्रामस्थांनी समानतेचा संदेश दिला.
जैतापूरचे ग्रामदैवत श्री देव वेताळची पालखी शिमगोत्सवात बाहेर काढली जाते, संपूर्ण गावात फिरते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सकाळी साडेआठच्या सुमारास श्रीदेव वेताळाची पालखी मंदिरातून बाहेर निघाली. यावेळी गावातील मानकरी, ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामस्थांबरोबरच महिलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. दळे, आगरवाडी, हुडदवळी अशी पालखी प्रदक्षिणा झाल्यावर दुपारच्या सुमारास महाप्रसाद घेण्यात आला. ज्या ज्या ठिकाणी प्रतिवर्षी पालखी थांबते, त्या ठिकाणी पालखीचे दर्शन व ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पाडला. पालखीसोबत असलेल्या सर्वांसाठी अल्पोपाहार व प्रसादाचे वाटप केले गेले. दुपारच्या महाप्रसादानंतर अनंतवाडी, मांजरेकरवाडी, पीरवाडी, चव्हाटावाडीमार्गे पालखी रात्री आठच्या सुमारास बाजारपेठेत आली.
दिवसभर पालखी नाचवीत आणलेल्या भाविकांबरोबर महिलांनीही पालखी खांद्यावर घेतली. राज्यभर महिलांना मंदिर वा दर्ग्यात प्रवेश देण्याबाबत वाद होत सुरू आहे. जैतापुरातील ग्रामस्थ मात्र गेल्या दोन - तीन वर्षांपासून गावातील प्रत्येक उत्सवात महिलांना सहभागी करून घेत आहेत.
दरवर्षी ११ मे रोजी होणाऱ्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातदेखील महिलांची उपस्थिती लक्षणीय असते. पालखी नाचवण्यासाठीही महिला पुढे येत असून, यावेळी अनेक महिला उत्साहाने पालखीचे भोई होण्याचा आनंद घेताना दिसल्या. महिलांचा उत्साह द्वीगुणित व्हावा, यासाठी ग्रामस्थही सहकार्य करीत होते.
बाजारपेठेपासून श्री देव वेताळ मंदिरापर्यंत सुमारे दोन ते अडीच तास महिलांनी पालखी खांद्यावर घेऊन नाचवत मंदिरापर्यंत आणली. पालकर यांच्या घरी पालखी विराजमान झाल्यानंतर विधीवत पूजन झाले.
त्यानंतर पालखी मंदिरात नेण्यात आली. दुसऱ्या दिवशी गावच्या मांडावर मधीलवाडा येथे रात्री रोंबाट कार्यक्रम होईल व पुन्हा सकाळी पालखी मधीलवाडा येथे जाईल. याच दिवशी शिंपणे कार्यक्रम पार पाडल्यानंतर शिमगोत्सवाची सांगता होईल. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश मांजरेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, कांचन पालकर, सरपंच शैलजा मांजरेकर, पोलीसपाटील राजप्रसाद राऊत यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते. (वार्ताहर)