किल्ले सिंधुदुर्ग सागरी हवाई सफरीला उत्स्फूर्त प्रतिसाद, पर्यटकांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 04:54 PM2018-05-21T16:54:17+5:302018-05-21T16:54:17+5:30

मालवण किनारपट्टीवर पहिल्यांदाच राबविल्या गेलेल्या सागरी हेलिकॉप्टर सफर उपक्रमाला दोन दिवसांत दोनशेहून अधिक पर्यटक व जिल्हावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, अशी माहिती आयोजक अन्वय प्रभू यांनी दिली.

Impressive response to the Fort Sindhudurg Sea Air Tourism, the choice of tourists | किल्ले सिंधुदुर्ग सागरी हवाई सफरीला उत्स्फूर्त प्रतिसाद, पर्यटकांची पसंती

किल्ले सिंधुदुर्ग सागरी हवाई सफरीला उत्स्फूर्त प्रतिसाद, पर्यटकांची पसंती

Next
ठळक मुद्देकिल्ले सिंधुदुर्ग सागरी हवाई सफरीला उत्स्फूर्त प्रतिसादहेलिकॉप्टरमधून अभिवादन, पर्यटकांची पसंती

मालवण : मालवण किनारपट्टीवर पहिल्यांदाच राबविल्या गेलेल्या सागरी हेलिकॉप्टर सफर उपक्रमाला दोन दिवसांत दोनशेहून अधिक पर्यटक व जिल्हावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, अशी माहिती आयोजक अन्वय प्रभू यांनी दिली. तर पर्यटकांचा असाच प्रतिसाद मिळाल्यास पावसाळ्यापूर्वी पुन्हा एकदा एरोलीप कंपनीच्या सहकार्याने हेलिकॉप्टर सफर केली जाईल, असा मानसही प्रभू यांनी व्यक्त केला.

मालवणच्या युवा पर्यटन व्यावसायिकांनी राष्ट्रशक्ती सामाजिक संस्था, पुणे व एरोलीप कंपनीच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या हवाई सफर उपक्रमाची यशस्वी सुरुवात झाली. मालवण शहरातील देऊळवाडा पेट्रोल पंपासमोरील मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवरून हेलिकॉप्टर उड्डाण करून उतरत होते.

अडीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या समुद्रातील किल्ले सिंधुदुर्गवर हे हेलिकॉप्टर पर्यटकांना घेऊन आठ अंकाच्या आकारात फेऱ्या मारत होते.

पर्यटन व्यावसायिक पुढाकार घेऊन पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र शासनाकडून असे पर्यटन प्रकल्प राबविण्याची खरी गरज आहे. स्कुबा डायव्हिंग, वॉटर स्पोटर््स, पॅरासेलिंग आदी समुद्री पर्यटनाकडे पर्यटक आकर्षिले जात असताना पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाने पावले उचलावीत.

एक खिडकी योजनेच्या माध्यमातून पर्यटन व्यावसायिकांना परवाने मिळावेत. शासनाने नवनव्या पर्यटन योजना राबवित स्थानिकांना बळ द्यावे, अशा भावना हेलिकॉप्टर उपक्रमास पुढाकार घेणारे मालवणचे पर्यटन व्यावसायिक अन्वय प्रभू, रुपेश प्रभू व रश्मीन रोगे यांनी व्यक्त केल्या आहेत.

एरोलीप कंपनीच्या विमान सेवेच्या माध्यमातून हा उपक्रम मालवण येथे राबविण्यात आला. एरोलीप कंपनीचे अधिकारी, पायलट व कर्मचारी यांच्या योग्य नियोजनामुळे व चांगल्या सेवेमुळे कोकण किनारपट्टीवरील हा पहिला उपक्रम यशस्वी ठरला.

समुद्रात उसळणाऱ्या लाटांमध्ये असणाऱ्या किल्ले सिंधुदुर्गचे विलोभनीय दृश्य व मालवण किनारपट्टीचा नयनरम्य नजारा पर्यटकांनी हेलिकॉप्टर सफरीमधून डोळ्यात साठविला.

किल्ले सिंधुदुर्गला अभिवादन!

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गडकिल्ल्यांचे हवाई दर्शन करता यावे यासाठी राष्ट्रशक्ती ही सामाजिक संस्था व एरोलीप कंपनीच्या सहकार्याने हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले.

मालवणात दुर्गदर्शनाचा पहिला प्रयत्न यशस्वी झाल्याने सह्याद्रीच्या पट्ट्यातील गडकिल्ले व समुद्रात असणारे दुर्ग किल्ले यांचेही विहंगम व विलोभनीय दृश्य पर्यटकांना पाहता यावे यासाठी हेलिकॉप्टर राईड सुरू करण्याचा विचार होता.

त्यानुसार पर्यटकांना सिंधुदुर्ग किल्ल्यासह मालवण किनारपट्टीचे हवाई दर्शन घडविण्यात आले. जिल्हावासीय व पर्यटकांचा या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला हवाई सफरीतून अभिवादन केले.

हेलिकॉप्टर सफरीतून किल्ले सिंधुदुर्गचे टिपलेले छायाचित्र.

Web Title: Impressive response to the Fort Sindhudurg Sea Air Tourism, the choice of tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.