मालवणच्या नगराध्यक्षांना कारावास

By admin | Published: May 28, 2016 01:00 AM2016-05-28T01:00:16+5:302016-05-28T01:01:29+5:30

मयेकर मारहाण प्रकरण : एक महिन्याची शिक्षा, मुलगाही दोषी

Imprisonment of mayor of Malvani | मालवणच्या नगराध्यक्षांना कारावास

मालवणच्या नगराध्यक्षांना कारावास

Next

मालवण : मारहाण प्रकरणातील गुन्ह्यात दोषी ठरविताना मालवणचे नगराध्यक्ष अशोक लाडोबा तोडणकर (वय ५५) यांना मालवण न्यायालयाने एक महिना साधा कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दीड वर्षांपूर्वी घडलेल्या याच मारहाण प्रकरणातील गुन्ह्यात त्यांचा मुलगा गणेश अशोक तोडणकर यालाही दोषी ठरविताना तीन महिन्यांचा साधा कारावास व सात हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावताना यातील हेमंत मिठबावकर या संशयिताची निर्दोष मुक्तता केली.
दरम्यान, अशोक तोडणकर व गणेश तोडणकर यांना तात्पुरत्या स्वरूपाचा १५ हजारांचा वैयक्तिक जामीन मंजूर करण्यात आला आहे. वरिष्ठ न्यायालयात या शिक्षेविरोधात अपील करेपर्यंत हा जामीन कायम राहणार आहे, तर या शिक्षेविरोधात जिल्हा न्यायालयात दाद मागणार असल्याचेही तोडणकर यांच्या वकिलाने स्पष्ट केले.१९ आॅक्टोबर २०१४ रोजी विधानसभा निवडणूक निकालानंतर वैभव नाईक यांच्या विजयानिमित्त फटाके वाजवत असताना हा वाद घडला होता. याबाबत मयेकर कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत अशोक तोडणकर, गणेश तोडणकर, हेमंत मिठबावकर या तिघांनी अश्लील शिवीगाळ करून तुळशीदास मयेकर, तपस्वी मयेकर यांना दांड्याने, लाथाबुक्क्याने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील चैनही तोडली होती, असे म्हटले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर रात्री उशिरा नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले होते की, वैभव नाईक यांच्या विजयानंतर तुळशीदास मयेकर कुटुंबीयांनी आपल्या दारात फटाके फोडले. त्याची विचारणा केली असता आपणास व आपला मुलगा यांना दांड्याने जबर मारहाण करून हाताचा चावा घेतला. या मारहाणीत मुलाचे सोन्याचे ब्रेसलेट, चैन गहाळ झाली. या प्रकरणी तपस्वी मयेकर, भाई मालंडकर, गौरी मयेकर, तृप्ती मयेकर, तुळशीदास मयेकर, (सर्व रा. वायरी मालवण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानुसार तोडणकर यांना ३२३ व ३४ कलमांन्वये एक महिना साधा कारावास व एक हजाराचा दंड, तर मुलगा गणेश तोडणकर याला दोषी ठरवताना प्रत्येकी एक महिना, असा तीन महिन्यांचा कारावास एकत्र स्वरूपात भोगणे व सात हजारांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच शिक्षा कारवाईनंतर दंड रकमेपैकी पाच हजार रुपये फिर्यादीस देण्याबाबतही न्यायालयाने आदेश दिले आहेत.


पाचही जणांची निर्दोष मुक्तता
तोडणकर मारहाणप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीनुसार तपस्वी मयेकर, भाई मालंडकर, गौरी मयेकर, तृप्ती मयेकर, तुळशीदास मयेकर या सर्वांवर तोडणकर यांना मारहाण व अन्य गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, सबळ पुराव्याअभावी या पाचही जणांची शुक्रवारी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Web Title: Imprisonment of mayor of Malvani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.