जिल्हा रुग्णालयातील कार्यपध्दती सुधारा
By admin | Published: July 3, 2016 11:08 PM2016-07-03T23:08:43+5:302016-07-03T23:08:43+5:30
विनायक राऊत यांच्या सूचना : मंत्री, आरोग्य संचालकांचे लक्ष वेधणार
ओरोस : जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना रुग्णसेवा देण्यापेक्षा मोबाईलचा गैरवापर वाढला असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या कार्यपद्धतीत सुधारणा करावी, अशी सक्त ताकीद खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन बिलोलीकर यांना दिली. तसेच जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली असता विविध समस्या दिसून आल्या. त्यामुळे या समस्या दूर करण्यासाठी आरोग्यमंत्री दीपक सावंत व आरोग्य संचालकांचे लक्ष वेधणार असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गत तीन महिन्यांपूर्वी जिल्हा रुग्णालयात गोवा येथील सुधीर शिंदे नावाच्या रुग्णाने डिसचार्जनंतर रुग्णालयातील या रुग्णसेवेच्या दूरवस्थेबाबतची तक्रार खासदार विनायक राऊत यांच्याकडे ३० जूनला केली आहे. त्या अनुषंगाने खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी अचानक जिल्हा रुग्णालयाला भेट देत जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराची पाहणी केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, छोटू पारकर, नागेंद्र परब उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयात मिळणारे भोजन हे दर्जाहीन आहे. रुग्णालयात साफसफाई योग्यप्रकारे केली जात नाही. येथील कर्मचारी रुग्णांना रुग्णसेवा देण्यासाठी कमी पडत आहेत. दरम्यान, रुग्णसेवा देण्यापेक्षा मोबाईलमध्ये जास्त रुची दाखवितात. यासारख्या विविध तक्रारींचे निवेदन गोवा येथील सुधीर शिंदे यांनी आपल्याला दिले होते. या निवेदनातील तक्रारी गंभीर स्वरूपाच्या असल्याने आपण आज या जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिल्याचे खासदार राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या भोजनाची पाहणी केल्यानंतर हे जेवण समाधानकारक नसल्याचे त्यांनी सांगितले. केवळ ८० रुपयात दिवसभरात जेवण, नाश्ता, चहा योग्य प्रमाणात पुरविणे शक्य नाही हे मान्य करत तसेच रुग्णाला चांगल्या प्रतीचे जेवण मिळावे यासाठी जेवणाचा भत्ता वाढवून देण्यासाठी आरोग्यमंत्र्यांना सूचित करणार असल्याचे सांगितले.
काही महिन्यांपूर्वी जिल्हा रुग्णालयाने एका सुदृढ व्यक्तीला एचआयव्ही बाधित प्रमाणपत्र दिले होते. याबाबत संबंधितांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या कार्यपद्धतीबाबत हल्लाबोल केला होता. या प्रकरणाची माहितीही राऊत यांनी घेतली. हे प्रकरण गंभीर असल्याने याची संपूर्ण चौकशी करावी. प्रसंगी सीआयडीची मदत घ्यावी. मात्र कोणत्याही परिस्थितीत दोषींवर कारवाई करावी अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या पाहणीत मस्टरवर सह्या असलेले काही कर्मचारी गायब असल्याचे आढळून आले तर काहींच्या सह्याच उशिरापर्यंत झाल्या नसल्याचे दिसून आले. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत याबाबत संबंधितांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.(वार्ताहर)
आॅपरेशन थिएटरमध्ये गळती सुरु
४दरम्यान यावेळी आॅपरेशन थिएटरची पाहणी केली असता यामध्ये गळती असल्याने रुग्णांना सुविधा देणे अशक्य होत आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असूनही केवळ गळतीमुळे रुग्णांना सुविधा देता येत नसल्याने ती सुधारावीत अशी मागणी करण्यात येणार आहे.
औषधांचा पुरवठा अनियमित
४जिल्हा रुग्णालयात औषध विभागालाही मार्चपासून औषधांचा वेळेवर पुरवठाच होत नसल्याचे आढळून आले. केंद्रशासनाच्या या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तसेच सद्यस्थितीत रुग्णालयाचा औषध विभाग जिल्हा नियोजनाच्या आॅक्सिजनवर सुरु असल्याची टिप्पणी जोडली.