अॅकॅडेमिक आॅडिटचा प्रमुख हेतू दर्जा सुधारणे : ए. पी. प्रधान
By admin | Published: March 30, 2015 09:41 PM2015-03-30T21:41:33+5:302015-03-31T00:26:58+5:30
देवरूखमध्ये मार्गदर्शन : शैक्षणिक संस्थांचा दर्जा सुधारावा
देवरुख : मुंबई विद्यापीठाने ज्या महाविद्यालयांमध्ये विविध ज्ञानशाखांसह उत्तम अध्यापकवर्ग, विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा व अध्यापनास उपयुक्त असे वातावरण आहे, अशा महाविद्यालयांची निवड ‘अॅकेडेमिक आॅडिटसाठी’ केली आहे. त्यामागचा उद्देश शैक्षणिक संस्थांचा दर्जा उंचावणे, त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करणे व विद्यार्थ्यांमधून राष्ट्राला प्रगतीपथावर नेणारा संवेदनशील नागरिक निर्माण करणे हा आहे, असे विचार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राचार्य डॉ. ए. पी. प्रधान यांनी देवरुख येथील आठल्ये - सप्रे - पित्रे महाविद्यालयातील अॅकेडेमिक आॅडिट प्रक्रियेच्या अनुषंगाने व्यक्त केले.कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा प्रधान हेतू हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण प्रगती साधणे हाच असायला हवा. त्यानुषंगाने शैक्षणिक व सहशैक्षणिक कार्यक्रमांची आखणी केली जावी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील कौशल्य लक्षात घेऊन त्यांना स्वयंपूर्ण करणारे प्रशिक्षण अभ्यासक्रमाबरोबर असावे, सर्व दृष्टीने अद्ययावत व सुसज्ज होऊन महाविद्यालयांनी स्वायत्त व स्वयंपूर्ण व्हावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.प्रधान यांच्या नेतृत्त्वाखाली प्रा. सी. जी. पाटील व के. आर. पाटील कमला महाविद्यालय, कोल्हापूर या पथकाने महाविद्यालयातील सर्व ज्ञानशाखांची माहिती घेतल्यावर महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांचे संशोधन क्षेत्रातील योगदान, क्रीडा व कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे सुयश, विद्यार्थिनी व महिलांसाठी महाविद्यालयाने राबवलेल्या उपक्रमांची शासन पातळीवर ‘जागर जाणीवांचा’ पुरस्कारान्वये घेतली गेलेली दखल आदी गोष्टींचे कौतुक करुन कोकणातील उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून होत असलेली महाविद्यालयाची वाटचाल उल्लेखनीय आहे.
विद्यापीठाने ज्या महाविद्यालयामध्ये विविध ज्ञानशाखांमध्ये करण्यात आलेल्या कामाची पहाणी या पथकाने केलीव समाधान व्यक्त केले. प्रधान यांनी याबाबत शिक्षकांचे कौतुक केले.
याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सदानंद भागवत, कार्यवाह गजानन जोशी, संस्था पदाधिकारी मुकुंद जोशी, शाळा समितीप्रमुख नेहा जोशी, भालचंद्र जोशी, शीतल सरदेसाई, प्रा. पांडुरंग भिडे, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महाविद्यालयातील सर्व शाखांची घेतली माहिती
प्रधान यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली पाहणी
महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकांनी केलेल्या उपक्रमांचे केले कौतुक