जखमी समर्थ हत्तीची तब्येत सुधारतेय
By admin | Published: April 26, 2015 11:35 PM2015-04-26T23:35:29+5:302015-04-27T00:16:15+5:30
वन विभागाची मेहनत : क्रेनच्या साह्याने उठविण्यात आले यश
माणगाव : आंबेरी येथील वन विभागाच्या क्षेत्रात क्रॉलमधील समर्थ हत्ती पुढच्या उजव्या पायाला जखम असल्याने शनिवारपासून उभा राहत नव्हता. मात्र, हत्तीला डॉ. उमाशंकर यांचे सहकारी करिमभय्या व बाबूराव मोरे यांच्या उपस्थितीत क्रेनच्या साहाय्याने उभा करण्यात विभागाला यश आले. वनविभागाने डॉ. उमाशंकर यांच्या टीमच्या साहाय्याने तीन हत्तींना क्रॉलमध्ये बंदिस्त केल्यावर सुमारे अडीच महिने होत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी गणेश नावाच्या हत्तीचा मृत्यू झाल्याने वन विभागाने सतर्कता बाळगत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साहाय्याने नेहमी उर्वरित भीम व समर्थ हत्तींच्या तब्येतीची काळजी घेतली. मात्र, गुरुवारी समर्थ हत्ती उठत नसल्याने डॉक्टरना पाचारण केले. डॉक्टरांनी सलाईन लावल्यानंतर समर्थ उठून फिरू लागला. शुक्रवारी डॉ. उमाशंकर यांनी हत्तींची पाहणी केली. मात्र, समर्थ हत्तीची तब्येत खालावल्याने त्याला क्रॉलबाहेर काढण्याचे नियोजन रद्द केले. त्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा समर्थ न उठल्याने वनविभागाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साहाय्याने त्याला उठविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. जेसीबीच्या साहाय्याने उठविण्याचाही प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने वन विभाग हतबल झाला. त्यानंतर प्रभारी उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी यांनी कर्नाटक येथील वनविभाग व डॉ. उमाशंकर यांच्याशी संपर्क साधला.
डॉ. उमाशंकर यांनी सहायक करिमभय्या व बाबूराव मोरे यांना रविवारी आंबेरी येथे पाठविले. ते दाखल होताच क्रेनच्या साहाय्याने समर्थला उठविण्यात वनविभागाला यश आले.
मोहिमेदरम्यान समर्थच्या उजव्या पायाला जखम झाल्याने त्याला उठता येत नव्हते. मात्र, तो दिलेले खाद्य व पाणीही पित असल्याने त्याची तब्येत ठीक होती. आज दुपारी ३.३० वाजता समर्थला उठविल्यानंतर त्याने अंगावर पाणी उडवून पाणी व खाद्य खाले. डॉ. एन. पी. खानोलकर, डॉ. टी. एस. वेर्लेकर, डॉ. व्ही. एम. पठाण यांनी हत्तींवर औषधोपचार केले.
यावेळी प्रभारी उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी, सहा. उपवनसंरक्षक एस. पी. बागडी, वनक्षेत्रपाल संजय कदम, वनपाल रामकृष्ण सातव, सावळा कांबळे, वैशाली वाघमारे, संतोष इब्रामपूरकर यासह वन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दोन दिवस अतोनात मेहनत घेतली होती. (प्रतिनिधी)
५वनविभागाची मेहनत
शनिवारी हत्ती उठण्यास तयार नसल्याने वनविभागाचे प्रकाश बागेवाडी, संजय कदम यासह कर्मचारी हत्तीची देखभाल करण्यात मग्न होते. हत्ती उठत नाही, तोपर्यंत सर्व ते सहकार्य करण्याची त्यांची भूमिका खरोखरच कौतुकास्पद होती.
रात्री उपवनसंरक्षक बागेवाडी, वनक्षेत्रपाल संजय कदम क्रॉलबाहेर झाडाखाली थांबून हत्तीची पाहणी करत होते. आज त्यांच्या श्रमाला फळ मिळाले असून समर्थ उठल्यामुळे आनंद व्यक्त केला. या दोन्ही हत्तींच्या खाण्यासाठी बेल्डेमाड, केळी, उसाची फाडे आदी जीवनसत्त्व असलेल्या वनस्पती देण्यास सुरुवात केली आहे.