राज्यात पहिल्यांदाच आढळल्या चतुरांच्या आणखी दोन प्रजाती; जैवविविधेत संशोधकांची यशस्वी कामगिरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 11:12 AM2022-02-26T11:12:21+5:302022-02-26T11:19:13+5:30
दक्षिण भारतातील चतुर किटकांची उत्तरेकडे झेप, सिंधुदुर्गातील संशोधकांची यशस्वी कामगिरी.
कुडाळ : महाराष्ट्रात मेरोगोंफस तमाराचेरिंसीस आणि आरचीबॅसीस ओसीलॅंस या चतुर व टाचणीच्या दोन प्रजातींची महाराष्ट्रात पहिल्यांदाच नोंद करण्यात संशोधकांना यश आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही प्रजाती सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडल्या आहेत. या संबंधीतील संशोधनपत्रक 'जर्नल ऑफ थेटनडटॅक्सा' मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे, अशी माहिती संशोधक व प्राध्यापक डॉ. योगेश कोळी यांनी दिली.
या प्रजातीचे संशोधन डॉ. योगेश कोळी व अक्षय दळवी यांच्या प्रयत्नातून हे संशोधन समोर आले आहे. डॉ. कोळी हे संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे प्राध्यापक असून गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधतेच्या अभ्यासासोबत इथल्या पाणथळ जागा आणि सडे संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
तसेच अक्षय दळवी हा द कॉर्बेट फाऊंडेशन, बांदा येथे फिल्ड बायोलोजिस्ट म्हणून काम करत असून पश्चिम घाटातील चतुरांवर संशोधन करत आहेत. या संशोधनादरम्यान डॉ. दत्तप्रसाद सावंत, श्री. अमोल कांबळी, गुरूनाथ कदम, प्रवीण सावंत, तेजस सावंत व मयुरी चव्हाण यांचेही सहकार्य लाभले.
या संपुर्ण कामगिरीतून महाराष्ट्रातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चतुरांचे वैविध्य पुन्हा एकदा अधोरेखत झाले आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या जिल्ह्यात वनस्पती व प्राणी संशोधनासाठी प्रचंड वाव असुन या ठिकाणी युवा संशोधक तयार होणं आवश्यक आहे, असे डॉ. कोळी यांनी म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा इथल्या वैविध्यपूर्ण अधिवासासाठी नेहमीच ओळखला जातो. त्यात अलीकडेच जिल्ह्याला सुंदर ठिकाणांच्या यादीत जागतिक दर्जाच स्थान प्राप्त झाले आहे. त्यामुळे तरुण वर्गाने या सगळ्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहिल्यास येत्या काळातही इथे अधिकाधिक संशोधन होऊन नवनवीन गोष्टी जगासमोर येतील हे मात्र नक्की.
आरचीबॅसीस या कुळामध्ये आरचीबॅचीस ओसीलॅंस ही फक्त एकच प्रजात सापडते, आणि आत्तापर्यंततीचे क्षेत्र हे केवळ दक्षिण भारतापुरतेच ज्ञात होते. आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काळसे-धामापुर परिसरात ही प्रजात सापडल्याने महाराष्ट्रातील टाचणींच्या यादीत आणखी एका टाचणीच्या प्रजातीची भर पडली आहे.
ही प्रजात आकाराने त्याच्या कुटुंबातील इतर प्रजातींपेक्षा थोडी मोठी असुन हिच्या शरिराचा रंग गडद निळा, व पोटावर विशिष्ट आकाराचे काळे पट्टे दिसतात. हि प्रजात बऱ्याच प्रमाणात तिच्या कुटुंबातील इतर प्रजातीं प्रमाणेच दिसत असल्याने सहजपणे दुर्लक्षित होते. परंतु तिच्या शरिराची लांबी आणि शेपटिचे टोक तसेच पोटावरच्या विशिष्ट अशा काळ्या रेघा यावरून हि प्रजात इतर प्रजातींपेक्षा थोडी वेगळी ठरते.
मेरोगोंफस या कुळामद्धे भारतात मेरोगोन्फस लोंजीस्टिगमा आणि मेरोगोंफस तमाराचेरिंसीस या फक्त २ प्रजाती सापडतात. विशेष म्हणजे या दोन्ही प्रजाती पश्चिम घाट प्रदेश निष्ठ प्रजाती आहेत. त्यांपैकी मेरोगोंफस तमाराचेरिंसीस ही फक्त दक्षिण भारतातील केरळ व, कर्नाटक राज्यातुन ज्ञात होती. आणि आता ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळोशी (देवगड), वरवडे (कणकवली) आणि दोडामार्ग येथे आढळली आहे.
मेरोगोन्फस कुळातील या दोन्ही प्रजातीही बऱ्याच अंशी दिसायला सारख्या असल्याने सुरुवातीला त्यांना एकच प्रजाती समजले जायचे. त्यानंतर झालेल्या संशोधनातून या दोन्ही प्रजाती वेगवेगळ्या असल्याचे समोर आले. त्यात तमाराचेरिंसिस ही प्रजात आजवर उत्तर पश्चिम घाटात आढळली नव्हती. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या नोंदी उत्तर पश्चिम घाटातील व पर्यायाने महाराष्ट्रातील पहिल्यांच नोंदी असल्याचे संशोधक अक्षय दळवी यांनी म्हटले आहे.