मुख्यमंत्री शिंदे गटाला कोकणात धक्का, कार्यकर्ते पुन्हा उद्धव ठाकरे गटात पतरले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 02:21 PM2022-11-29T14:21:26+5:302022-11-29T14:32:13+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरच्या घडामोडींना वेग
खारेपाटण : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक - २०२२ च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या अति संवेदनशील असलेल्या कणकवली तालुक्यात रोज विविध राजकीय पक्षाकडून नेते व कार्यकर्त्यांच्या पक्षांतरच्या बातम्या सतत पुढे येत आहेत. सोमवारी (दि.२८) खारेपाटणमध्ये बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या पक्षाच्या दोन युवा कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते सतीश सावंत व जिल्हा युवा सेनाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
माजी खासदार सुधीर सावंत व किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात खारेपाटण येथील युवा सेनेचे कार्यकर्ते प्रज्योत मोहिरे व सुजय पाटणकर यांनी प्रवेश केला होता. मात्र त्यांचा पक्षप्रवेश हा काही औटघटकेचाच ठरला.
खारेपाटण शिवसेना शाखा कार्यलयात शिवसेना नेते सतीश सावंत युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, शैलेश भोगले व कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रज्योत मोहिरे व सुजय पाटणकर यांनी शिवसेना पक्षात पुन्हा एकदा प्रवेश केला. यामुळे शिंदे गटाकडे गेलेले शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आता हळूहळू स्वगृही परत येऊ लागले आहेत. त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी खारेपाटण-तळेरे विभाग प्रमुख दयानंद कुडतरकर, उपविभाग प्रमुख शिवाजी राऊत, युवा सेना प्रमुख तेजस राऊत, जेष्ठ शिवसेना कार्यकर्ते अनंतराव गांधी, चंद्रकांत शेट्ये, प्रणय उपाध्ये, प्रणोती पराडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.