सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन नगरपंचायत भाजपकडे, एक सेना राष्ट्रवादीकडे, एक त्रिशंकू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 12:40 PM2022-01-19T12:40:19+5:302022-01-19T13:55:18+5:30
नीतेश राणे दोन पैकी एका नगरपंचायतीवर विजय तर एकीकडे पराभव, वैभव नाईक यांना ही स्पष्ट बहुमत नाही, तर केसरकरांचा दोडामार्ग मध्ये दारूण पराभव झाला आहे.
महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील चार नगरपंचायतपैकी वैभववाडी व दोडामार्गमध्ये भाजपचा एकतर्फी विजय. देवगडमध्ये महाविकास आघाडी तर कुडाळमध्ये त्रिशंकू परिस्थिती. जिल्ह्यातील तिन्ही विद्यमान आमदारांना जनतेने धक्कादायक निकाल दिला आहे. नीतेश राणे दोन पैकी एका नगरपंचायतीवर विजय तर एकीकडे पराभव, वैभव नाईक यांना ही स्पष्ट बहुमत नाही, तर केसरकरांचा दोडामार्ग मध्ये दारूण पराभव झाला आहे.
जिल्ह्यातील देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत भाजपला नाकारून जनतेन सेना राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिला. १७ पैकी भाजप ८, शिवसेना ८ आणि राष्ट्रवादी १ जागा मिळाली. त्यामुळे भाजपचा येथे निसटता पराभव झाला आहे. आमदार नीतेश राणेंसाठी तो धक्का मानला जात आहे.
दुसरीकडे वैभववाडी नगरपंचायत मध्ये नीतेश राणेंनी बालेकिल्ला शाबूत ठेवला आहे. १७ पैकी ९ जागा मिळवून सत्ता काबीज केली आहे. दोन अपक्ष निवडणून आले आहेत. ते मुळचे भाजपचे आहेत. वैभववाडीत भाजप ९, शिवसेना ५ आणि अपक्ष ३ निवडून आले आहेत.
कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष ठरला असला तरी सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात द्यायच्या हे काँग्रेस ठरविणार आहे. याठिकाणी भाजपला ८, सेनेला ७ आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत. याठिकाणी काँग्रेस स्वतंत्र निवडणूक रिंगणात होता. तर सेना आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. त्यामुळे याठिकाणी त्रिशंकू अवस्था आहे. आता कोणाच्या हातात सत्ता द्यायची हे भाजप ठरविणार आहे. आमदार वैभव नाईक राज्यात सत्ता असतानाही नगरपंचायत निवडून आणू शकलेले नाही. आता त्यांना काँग्रेसचा आधार घ्यावा लागणार आहे.
दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत भाजपने सेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीला धोबीपछाड देत १७ पैकी तब्बल १३ जागा जिंकून आमदार दीपक केसरकर यांना मोठा धक्का दिला आहे. येथे सेनेला २, राष्ट्रवादी १ व अपक्ष १ असे पक्षिय बलाबल राहिले आहे.
एकंदरीत भाजपने जिल्हा बँक निवडणूक पाठोपाठ चारपैकी दोन नगरपंचायत जिंकून आघाडी घेतली आहे. तर अन्य दोन ठिकाणी भाजपला चांगले यश मिळाले आहे. आता प्रत्यक्षात नगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी भाजप चारही ठिकाणी नगराध्यक्ष बसविण्यासाठी प्रयत्न करेल यात काही शंका नाही.