परशुराम उपरकरांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये येत्या रविवारी निर्धार मेळावा
By सुधीर राणे | Published: February 15, 2024 05:37 PM2024-02-15T17:37:42+5:302024-02-15T17:38:20+5:30
कणकवली: नववर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही मनसेच्या आजी - माजी पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना राज ...
कणकवली: नववर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही मनसेच्या आजी - माजी पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना राज ठाकरे यांच्यावरील प्रेम आणि निष्ठा तेव्हाही कायम होती आणि आताही कायम आहे. परंतु पक्षात जमलेल्या काही बांडगुळानी पक्ष संघटना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली आहे.त्यामुळे आम्ही माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे रविवारी (दि.१८) सकाळी ११ वाजता 'निर्धार मेळावा' घेत आहोत. लोकसभा निवडणुकीपूर्वी पुढील दिशेबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रसाद गावडे व मनसेच्या माजी कार्यकर्त्यांनी येथे दिली.
कणकवली येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आशिष सुभेदार, विनोद सांडव, आबा चिपकर, आप्पा मांजरेकर, राकेश टँगसाळी, मंदार नाईक, बाबल गावडे, प्रकाश साटेलकर, दीपक गावडे, नाना सावंत, बाळकृष्ण ठाकूर, गणेश गावडे आदींसह मनसे माजी पदाधिकारी उपस्थित होते.
आमचा हा मेळावा कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपणारा आणि निष्ठेला बळ देणारा तसेच परशुराम उपरकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा असणार आहे. मात्र,आगामी काळात नेमके कोणत्या दिशेने जायचे हे तो मेळावा झाल्यानंतर एकत्र बसून ठरविणार आहोत. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही निर्णय घेणार आहोत.
मनसेमध्ये सच्चा कार्यकर्त्यांना बाजूला करत स्वतःच्या मर्जीतले आयाराम, गयाराम लोक नेमण्याचे कार्य सुरू करण्यात आले. त्यामुळे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. मात्र पुढची दिशा कोणती घेणार? याबाबत कुठलाही निर्णय आम्ही घेतलेला नव्हता. जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने या सर्व पदाधिकाऱ्यांची मते आणि विचार जाणून घेण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी कुडाळ ओंकार डिलक्स येथील सभागृहात निर्धार मेळावा आयोजित केला आहे.
या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील ग्रामस्तरीय पदाधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याला माजी आमदार परशुराम उपरकर यांना देखील निमंत्रित करून आमच्या भावना जाहीर व्यासपीठावर व्यक्त करणार आहोत असेही प्रसाद गावडे यांनी यावेळी सांगितले.