दिवाळीआधी चिपी विमानतळाचे उद्घाटन: प्रसाद लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 10:57 PM2018-09-07T22:57:25+5:302018-09-07T22:57:29+5:30

Inauguration of Chhipi Airport before Diwali: Prasad Lad | दिवाळीआधी चिपी विमानतळाचे उद्घाटन: प्रसाद लाड

दिवाळीआधी चिपी विमानतळाचे उद्घाटन: प्रसाद लाड

Next

रत्नागिरी : सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाबाबतच्या सर्व परवानग्या मिळणे अजून बाकी आहेत. त्यामुळे १२ सप्टेंबरला विमानतळाचे उद्घाटन होणार ही अफवा आहे. या सर्व चाचण्या लवकरच पूर्ण होतील. त्यानंतर येत्या दसरा किंवा दिवाळीच्याआधी चिपी विमानतळाचे उद्घाटन होईल. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी माझ्याबरोबर झालेल्या दूरध्वनी संभाषणात हे स्पष्ट केले आहे. तसेच रत्नागिरीच्या विमानतळाचे उद्घाटन १ जानेवारी २०१९ पूर्वी करावे, हा आमचा आग्रह त्यांच्याकडून पूर्ण करून घेऊ, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाबाबत बोलायचे तर माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी हा विमानतळ होण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. ते मुख्यमंत्री असल्यापासून त्यांचे प्रयत्न होते. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर चिपी विमानतळ हे राज्याच्या अखत्यारित आणून राज्याच्या माध्यमातून कोकणचा विकास करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील उडान योजनेअंतर्गत चिपी व रत्नागिरी हे विमानतळ होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊनच या विमानतळांचे उद्घाटन होईल, असे लाड म्हणाले. खासदार विनायक राऊत म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही घोषणा केल्या तरी स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी सक्षम असेल तरच विमानतळ वा अन्य योजनांची अंमलबजावणी होऊ शकते, याबाबत आमदार लाड यांना विचारले असता ते म्हणाले, खासदारांबाबत मला आदर आहे; परंतु योजना आणण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री सक्षम असावे लागतात. त्यांच्याकडे व्हिजन असावे लागते. निधीची तरतूद होऊनच योजना मार्गी लागते, याचा खासदार राऊत यांना विसर पडू नये.
लवकरच विमानाच्या चाचण्या
रत्नागिरी विमानतळ तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. त्यामुळे येथून प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यात आला आहे. रत्नागिरी व चिपी विमानतळावर विमानाच्या चाचण्या होतील. त्याचा अहवाल केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडे जाईल. तेथून राज्य सरकारकडे अहवाल येईल. रत्नागिरीसाठी मुंबई-रत्नागिरी, पुणे-रत्नागिरी व दिल्ली-रत्नागिरी सेवा सुरू होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
कोल्हापूर विमानतळ आॅक्टोबरमध्ये सुरू!
कोल्हापूर विमानतळही आॅक्टोबर २०१८च्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. तेथे पहिल्या दिवसापासून इंडिगो व स्पाईसजेट या खासगी कंपन्यांची विमान सेवा सुरू होत आहे. या विमानतळाची क्षमता वाढविण्यात आली आहे. त्यामुळे येथून कोल्हापूर -दिल्ली तसेच दक्षिणेकडील राज्यांमध्येही विमानसेवा सुरू होऊ शकेल. कोल्हापूरच्या कनेक्टिव्हिटीचा फायदा रत्नागिरी व सिंधुदुर्गलाही होऊ शकेल, असा विश्वास आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.

Web Title: Inauguration of Chhipi Airport before Diwali: Prasad Lad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.