वैभववाडीत राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 12:28 PM2020-12-16T12:28:55+5:302020-12-16T12:30:33+5:30
Ncp, Vaibhawadi, Sindhudurgnews जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला कुणीही कमी लेखण्याची चूक करू नये. जिल्ह्यात आमची ताकद वाढत असून येत्या निवडणुकीत विरोधी पक्ष भाजपासह गरज भासल्यास मित्रपक्षांनाही पक्षाची ताकद दाखवून देऊ असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी येथे दिला.
वैभववाडी : जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला कुणीही कमी लेखण्याची चूक करू नये. जिल्ह्यात आमची ताकद वाढत असून येत्या निवडणुकीत विरोधी पक्ष भाजपासह गरज भासल्यास मित्रपक्षांनाही पक्षाची ताकद दाखवून देऊ असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी येथे दिला.
तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी काका कुडाळकर, विधानसभाप्रमुख अनंत पिळणकर, अशोक पवार, समीर आचरेकर, रुपेश जाधव, डॉ. अभिनंदन मालंडकर, भास्कर परब, रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, गेले वर्ष-दीड वर्ष जिल्ह्यात आम्ही संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. पक्षाचे अनेक पदाधिकारी ते काम प्रामाणिकपणे करीत आहेत. त्याचा चांगला परिणाम आता दिसून येत आहे. जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत आमचा पक्ष ताकदीने उतरणार आहे.
आमचा पहिला शत्रू भाजप असून त्या पक्षाविरोधात आम्ही ताकदीने काम करणार आहोत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविली जावी असा आमचा आग्रह असणार आहे. परंतु पक्षाला सन्मानाचा वाटा मिळणे आवश्यक आहे.
जर मित्रपक्षांनी सन्मान राखला नाही तर मात्र आमचा मार्ग आमच्यासाठी मोकळा असणार आहे. दरम्यान, भविष्यात गाव तिथे राष्ट्रवादी अशी संकल्पना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बूथवर किमान पाच तरी कार्यकर्ते तयार करण्याचे काम केले जाणार आहे, असेही ते म्हणाले.
निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढविणार
वाभवे वैभववाडी नगरपंचायतीत काम करणाऱ्या कारभाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत नागरिकांचा भ्रमनिरास केला आहे. शहराचा अपेक्षित विकास झाला नाही. नगरपंचायतीचा वापर निव्वळ स्वत:च्या राजकारणासाठी काहींनी केला. शहरातील जनतेचा पाण्यासारखा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्यावरच लढविणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.