मालवण पर्यटन महोत्सवाचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, समारोपाला केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 02:07 PM2022-05-12T14:07:22+5:302022-05-12T14:08:54+5:30
तीन दिवस हा महोत्सव सुरु राहणार असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मालवण : मालवण नगरपरिषदेच्या वतीने दांडी बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या “जल्लोष २०२२” पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन उद्या, शुक्रवारी (दि.१३) सायंकाळी ६ वाजता राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी याबाबत माहिती दिली.
तीन दिवस हा महोत्सव सुरु राहणार असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर रविवारी १५ मे रोजी सायंकाळी ६ ते ९ यावेळेत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला खा. विनायक राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे, बाळाराम पाटील, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे उपस्थित राहणार आहेत. तर १५ मे रोजी होणाऱ्या समारोप सोहळ्याला आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
१३ मे रोजी नौका सजावट स्पर्धा, वाळू शिल्प कलाकृती, सायकल रॅली होणार आहे. तर सायंकाळी ४ ते ५ वाजता मालवणी खाद्य पदार्थ पाककला स्पर्धा, सायंकाळी ६ ते १० आमदार वैभव नाईक श्री शरीर सौष्ठव स्पर्धा, गायन स्पर्धा, स्थानिक दशावतार (महिला व पुरुष) होणार आहे. १४ मे रोजी सायंकाळी ४ ते ६ खेळ पैठणीचा तर सायंकाळी ७ ते १० मालवण सुंदरी स्पर्धा आणि नृत्य सादरीकरण होणार आहे.
१५ मे रोजी सायंकाळी ५ ते ६ लोककलाकार कार्यक्रम, सायंकाळी ६ ते ७ बक्षीस आणि सांगता समारंभ तर सायंकाळी ७ ते १० यावेळेत “जल्लोष” हा सिनेकलावंतांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी या महोत्सवाचा पर्यटक, नागरिकानी लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.