सिंधुदुर्ग : भैरी भवानी प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 02:12 PM2018-01-10T14:12:20+5:302018-01-10T14:23:46+5:30
कोकणातील शोषित, पीडित कामगारांचा व तरुणांचा रोजगाराचा प्रश्न भैरीभवानी प्रतिष्ठान संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सोडविला जाईल. त्यासाठी आपल्या संघटनेचा प्रयत्न राहणार असून माझ्या कामगार संघटनेची संपूर्ण ताकद अतुल रावराणे त्यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत त्यांच्या पाठीशी राहील, असे मत धडक कामगार युनियनचे अध्यक्ष व अखिल भारतीय मराठा महासंघाचे मुंबई अध्यक्ष अभिजीत राणे यांनी भैरीभवानी प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केले.
वैभववाडी : कोकणातील शोषित, पीडित कामगारांचा व तरुणांचा रोजगाराचा प्रश्न भैरीभवानी प्रतिष्ठान संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सोडविला जाईल. त्यासाठी आपल्या संघटनेचा प्रयत्न राहणार असून माझ्या कामगार संघटनेची संपूर्ण ताकद अतुल रावराणे त्यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत त्यांच्या पाठीशी राहील, असे मत धडक कामगार युनियनचे अध्यक्ष व अखिल भारतीय मराठा महासंघाचे मुंबई अध्यक्ष अभिजीत राणे यांनी भैरीभवानी प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केले.
वैभववाडी बाजारपेठेतील दत्तमंदिरनजीक भैरी भवानी प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आचिर्णेचे प्रतिष्ठित नागरिक शिवाजी रावराणे व अभिजीत राणे यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे, सभापती लक्ष्मण रावराणे, बंडू मुंडल्ये, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, माजी बांधकाम सभापती दिलीप रावराणे, प्रभानंद रावराणे, विजय रावराणे, स्वानंद रावराणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संदेश सावंत, रासाईदेवी देवस्थान सल्लागार उपसमितीचे अध्यक्ष गिरीधर रावराणे, माजी महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, पंचायत समिती सदस्या अक्षता डाफळे, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, सीमा नानिवडेकर, हिरा पाटील, आदी उपस्थित होते.
अभिजीत राणे पुढे म्हणाले की, अतुल रावराणे हे माझे बंधू असून माझ्या वाटचालीत त्यांनी मला भक्कम पाठबळ दिले आहे. सुमारे साडेपाच लाख कामगार माझ्या धडक युनियनमध्ये आहेत.
अतुल रावराणेंच्या पुढाकाराने वैभववाडी, कणकवली, मालवण व देवगडमधील सुमारे अडीच हजार तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न कामगार युनियनच्या माध्यमातून मला सोडविता आला. यापुढे कोकणातील कामगारांच्या प्रश्नांवर आम्हांला काम करायचे असून त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून चांगले काहीतरी उभे करण्यासाठी माझ्या संघटनेची संपूर्ण ताकद अतुल रावराणे यांच्या मागे उभी राहील.
अतुल रावराणे म्हणाले की, मुंबई, बदलापूर आणि जिल्ह्यात काम करताना जनतेच्या संपर्कासाठी निश्चित असे ठिकाण नव्हते. त्यामुळे कामानिमित्त भेटायला येणाऱ्यांची गैरसोय होत होती. त्यामुळे जनतेशी संपर्क ठेवणे सुलभ व्हावे, यासाठी भैरीभवानी प्रतिष्ठानचे कार्यालय सुरु केले आहे.
तरुणांच्या रोजगाराच्या समस्या अभिजीत राणे यांच्या धडक कामगार युनियनच्या माध्यमातून सोडवूच! शिवाय केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा सर्वसामान्य जनतेला लाभ मिळवून देणे व लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी या कार्यालयातून सोडविल्या जातील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तरुणांना दिशाचा प्रयत्न
नागरिकांच्या अडचणी सोडवितानाच येथील क्रीडा व सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन देत तरुण पिढीला दिशा देण्याचा भैरी भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपला प्रयत्न राहणार आहे. या कार्यालयाचे व्यवस्थापन बंंडू मुंडल्ये पाहणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी भैरीभवानी प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयात आपले कार्यालय समजून यावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी केले आहे.