मळगावात आज रेल्वे टर्मिनसचे उद्घाटन
By admin | Published: June 26, 2015 10:33 PM2015-06-26T22:33:31+5:302015-06-27T00:22:03+5:30
रेल्वेमंत्र्यांची उपस्थिती : मोठा पोलीस बंदोबस्त
सावंतवाडी : बहुचर्चित सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे उद्घाटन आज, शनिवारी होणार असून, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली असून, चोख पोलीस बंदोबस्त कार्यक्रमासाठी ठेवण्यात आला आहे. सावंतवाडी मळगाव येथे रेल्वे टर्मिनस व रेल्वे विस्तृतीकरणाचा प्रारंभ शनिवारी होत आहे. गेली कित्येक वर्षे टर्मिनस मडुरा येथे होणार की मळगाव येथे होणार, याचीच उत्सुकता सर्वांना होती. तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी टर्मिनससाठी मडुऱ्याचा आग्रह धरला होता; पण केंद्रात भाजपचे सरकार येताच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे टर्मिनस मळगाव येथे मंजूर केले आणि सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला आहे.याच रेल्वे टर्मिनसचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, यासाठी मुख्यमंत्री शुक्रवारी रात्री उशिरा गोव्यात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर शनिवारी सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री रेल्वेमंत्र्यांसोबत कार्यक्रमस्थळी येणार असून, हा मुख्य कार्यक्रम एक तास चालणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री तातडीने गोव्याकडे रवाना होणार आहेत.
टर्मिनसच्या उद्घाटनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे या बंदोबस्तावर विशेष लक्ष ठेवून आहेत. मळगाव टर्मिनस पूर्वीपासून वादग्रस्त ठरले आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. टर्मिनसच्या उद्घाटनाबरोबरच मळगाव येथे रेल्वेच्या विस्तारीकरणाचा प्रारंभ होणार आहे. (प्रतिनिधी)