ाहिल्या थ्रीडी, स्मार्ट डिजिटल शाळेचे उद्घाटन
By admin | Published: October 17, 2016 12:11 AM2016-10-17T00:11:18+5:302016-10-17T00:11:18+5:30
लोकसहभाग : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी प्राथमिक शाळेत साकारला उपक्रम
चौके : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळसे बागवाडी येथे लोकसहभागातून साकारलेल्या जिल्ह्यातील पहिल्या थ्रीडी प्रोजेक्टरयुक्त स्मार्ट डिजिटल व टॅबयुक्त शाळा उपक्रमाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात करण्यात आले.
यामध्ये स्मार्ट डिजिटल खोलीचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या हस्ते, तर विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण आणि कार्यालयाचे उद्घाटन ठाण्याचे तहसीलदार विनोद गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडीचे संस्थापक अच्युत सावंत-भोसले, जिल्हा परिषद सदस्या श्रावणी नाईक, मालवण पंचायत समिती सभापती हिमाली अमरे, पंचायत समिती सदस्य भाग्यता वायंगणकर, काळसे सरपंच भावना मेस्त्री, शिक्षण विस्तार अधिकारी वसंत महाले, आंबेरी केंद्रप्रमुख छोटूराम पवार, केशव सावंत, उमेश प्रभू, काळसेचे उपसरपंच चंद्रकांत दळवी, विषयतज्ज्ञ गौरी नार्वेकर, काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष अर्चना प्रभू, शिवाजी विद्यामंदिर काळसेचे मुख्याध्यापक किशोर वालावलकर, काळसे बागवाडी सेवा मंडळ मुंबईच्या अध्यक्ष सदानंद केळजी, माजी विद्यार्थी सेवा संघाचे अध्यक्ष भाऊ नार्वेकर, ग्रामपंचायत सदस्या दीपिका म्हापणकर, अखिल भारतीय शिक्षण संघाचे जिल्हाध्यक्ष म. ल. देसाई, माजी सभापती राजेंद्र परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिनल कोरगांवकर, काळसे बागवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल परुळेकर, गावातील सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
पहिली थ्रीडी प्रोजेक्टरयुक्त स्मार्ट डिजिटल आणि विना दप्तर, टॅबयुक्त शाळेचा बहुमान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळसे बागवाडी शाळेने मिळविला. यात स्थानिकांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. शाळा डिजिटल करण्याचे ठरल्यानंतर ग्रामस्थांनी विलक्षण प्रेरणेने लोकवर्गणीतून ३ लाख रुपये उभे करून शाळेला हा मान मिळवून दिला. आजपासून आपल्याला शाळेत दप्तर घेऊन जायला नको याचा आनंद आणि अभिमान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
यावेळी काळसे गावचे भूमिपुत्र आणि ठाण्याचे तहसीलदार विनोद गोसावी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, गावचा विकास होत असताना लोकसहभागातून अशाप्रकारे राबविलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक वाटते. शासनाच्या धोरणानुसार भविष्यात कमी पटसंख्येच्या शाळांचे एकाच शाळेत विलीनीकरण करताना अशा सर्व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा पुरविणाऱ्या शाळांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. यासाठी जिल्हा
परिषद अध्यक्षांचे सहकार्य मोलाचे ठरेल.
जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर म्हणाले की, जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने थ्रीडी डिजिटल शाळेच्या उद्घाटनाचे अतिशय चांगले कार्य माझ्या हातून घडले आहे. अशा प्रकारच्या डिजिटल शाळांमुळे ग्रामीण भागातील मुले शहरी भागातील मुलांशी स्पर्धा करताना कमी पडणार नाहीत हा डिजिटल शाळेचा उपयोग आहे. विद्यार्थ्यांना सुशिक्षित बनविताना त्यांना सुसंस्कृत बनविणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
यावेळी सर्व मान्यवर, जमीनदाते उमेश प्रभू आणि डिजिटल शाळा उपक्रमासाठी ज्यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका शीतल परुळेकर, सूत्रसंचालन श्वेता यादव यांनी केले. आभार गौरी नार्वेकर यांनी मानले. (वार्ताहर)