सिंधुदुर्गात पावसाची संततधार, शेतकऱ्यांची उडणार तारांबळ
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 6, 2022 01:17 PM2022-10-06T13:17:58+5:302022-10-06T16:16:31+5:30
भात कापणीवेळी काही प्रमाणात दडी मारलेल्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त
सिंधुदुर्ग : राज्याच्या काही भागात यावर्षी पावसाने सरासरी गाठली असली तरी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पावसाची सरासरी गाठून बरसणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र, यावर्षी ७० टक्केच पाऊस झाला होता. त्यामुळे पावसाचे मोसमी चार महिने जरी कागदोपत्री संपले असले तरी जिल्ह्यात पाऊस आपली सरासरी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पडून पूर्ण करणार असल्याचे आताच्या स्थितीवरून स्पष्ट होत आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवसापासून पावसाने अधूनमधून बरसण्यास सुरूवात केली असताना. काल, दसऱ्या दिवशी सायंकाळी जिल्ह्याच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. मध्यरात्रीनंतर पावसाने जोरदार बरसण्यासही सुरूवात केली होती. सकाळच्या सत्रात काही प्रमाणात सुर्यदर्शन झाल्यानंतर दुपारी १२ नंतर पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावल्याने आता शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
भातकापणीच्या हंगामातच पाऊस
पावसाने संततधार बरसायला सुरूवात केल्याने शेतकर्यांसमोर पुन्हा एकदा मोठे संकट उभे टाकले आहे. आता भातकापणीचा हंगाम सुरू होणार आहे. दसऱ्यानंतर जिल्ह्यात भातकापणीला सुरूवात होते. मात्र, आता दसर्याच्या पूर्वसंध्येलाच पावसाने पुन्हा जोरदार कमबॅक केले आहे. त्यामुळे भातकापणीच्यावेळी शेतकऱ्यांची तारांबळ उडणार आहे.
वार्षिक सरासरी पेक्षा कमी पाऊस
पावसाच्या जून, जुलै आणि ऑगस्ट या तिन महिन्यात सरासरीच्या तुलनेने जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस झाला होता. जुलै महिन्यात काही प्रमाणात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थितीदेखील होती. त्यामुळे या अतिवृष्टीत घरांसह नदीकाठच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, पावसात सातत्य नसल्याने वार्षीक सरासरी पूर्ण झाली नाही.
डिसेंबरपर्यंत राहणार पाऊस
आता पावसाचे महिने जरी संपले असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असतोच. गेल्या आठ ते दहा वर्षात असा प्रकार सातत्याने सुरू आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात अवकाळी पाऊस राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
भात कापणी करायची कशी ?
भात लावणीच्यावेळी काही प्रमाणात दडी मारलेल्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता. त्यानंतर भात लावणी झाल्यानंतर पुन्हा भरडी भाताला पावसाची गरज होती. त्यावेळी काही प्रमाणात पाऊस नव्हता. आता भात तयार होवून कापणीला आले असताना मात्र, परतीचा पाऊस जोरदार बरसत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून भातकापणी करायची कशी ? असा प्रश्न त्याला सतावत आहेत.