सिंधुदुर्गात पावसाची संततधार, ऑरेंज अलर्ट जारी
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 24, 2023 02:35 PM2023-06-24T14:35:38+5:302023-06-24T14:36:23+5:30
वादळीवारे नसल्याने नुकसान नाही
सिंधुदुर्ग : जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दडी मारलेल्या पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल, शुक्रवार पासून चांगलाच कमबॅक केला. आज, शनिवारीही दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे बळीराजा सुखावला असून पाणीटंचाईची समस्या पूर्णपणे मिटली आहे. वरुणराजाच्या हजेरीमुळे आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार आगामी दोन दिवस सुरू राहिल्यास नदी, नाल्यामध्ये पाणी वाहू लागणार आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत पाऊस सुरू असला तरी वादळीवारे, गडगडाट नसल्यामुळे कोणतीही हानी झाल्याची नोंद आपत्ती विभागाकडे झाली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी रात्री अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, शनिवारी सकाळपासूनच सर्वदूर मान्सूनच्या धारा कोसळत आहेत. दरम्यान, तळकोकणात पावसाचा जोर आणखी वाढणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आर्द्रा नक्षत्रात जोरदार कमबॅक
यावर्षी पावसाने मृग नक्षत्र कोरडे घालवले होते. त्यामुळे जूनचा पहिला पंधरवडा पाऊस गायब होता. मात्र, शुक्रवारी आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाल्यानंतर जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून जिल्ह्यातील कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. कणकवली शहरात महामार्गावरील उड्डाणपुलामुळे कृत्रिम धबधबे निर्माण झाले आहेत. पुलावरील पाणी खाली कोसळत असल्यामुळे त्याचा त्रास वाहनधारक आणि पादचाऱ्यांना होत आहे.