दरोडा घालणाऱ्या प्रमुख आरोपीसह दोघे ताब्यात, निरुखे-पांग्रड येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 02:03 PM2019-10-07T14:03:02+5:302019-10-07T14:04:53+5:30
दीड वर्षांपूर्वी निरूखे पांग्रड येथील रामदास करंदीकर यांच्या घराची सीआयडी अधिकारी असल्याचा बनाव करून झडती घेत साडेपाच लाख रुपयांची लूट करून दरोडा घालणाऱ्या प्रमुख आरोपीसह अन्य एका आरोपीला सिंधुदुर्ग पोलीस पथकाने ताब्यात घेतले.
सिंधुदुर्गनगरी : दीड वर्षांपूर्वी निरूखे पांग्रड येथील रामदास करंदीकर यांच्या घराची सीआयडी अधिकारी असल्याचा बनाव करून झडती घेत साडेपाच लाख रुपयांची लूट करून दरोडा घालणाऱ्या प्रमुख आरोपीसह अन्य एका आरोपीला सिंधुदुर्ग पोलीस पथकाने ताब्यात घेतले.
मुख्य सुत्रधार श्रीजीत रमेशन (देहू रोड, पुणे) याला नवी मुंबईतून तर दुसरा संशयीत इरफान निजामुद्दीन शेख (रा.पुणे) याला पुण्यातून अटक करण्यात आली, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान या दोन्ही संशयितांना कुडाळ न्यायालयाने ९ पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, सावंतवाडी विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक गेडाम म्हणाले, २२ एप्रिल २०१८ रोजी कुडाळ तालुक्यातील निरूखे करंदीकरवाडी येथील रामदास पुरूषोत्तम करंदीकर यांच्या घरी सीआयडीचे बनावट अधिकारी बनून आलेल्या काहीजणांनी आपण पोलीस अधिकारी असून अवैध मालमत्तेचा शोध घेण्यासाठी झाडाझडती घेणार असल्याचे सांगत घराची झडती घेतली होती. या झडतीत करंदीकर यांच्या घरातील साडेपाच लाख रुपयांची लूट करण्यात आली होती.
या प्रकरणात करंदीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित बनावट अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण ९ आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. पैकी यापूर्वी ५ संशयितांना अटक करण्यात आली होती. तर चार संशयीत फरार होते. यातील प्रमुख सूत्रधारासह अन्य एका आरोपीस गुरूवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली. सुत्रधार श्रीजीत हा मुंबईत एका टोलनाक्यावर कामाला होता.
पोलिसांना चकवा देण्याच्या उद्देशाने तो दिवसाही आपल्या राहत्या घरी जात नव्हता. तर त्याचा अन्य साथीदार इरफान हा पुणे येथे ड्रायव्हर म्हणून कामाला होता. दोघेही पोलिसांना सापडत नव्हते. पोलिसांचे विशेष पथक या आरोपींच्या शोधार्थ तब्बल दहा वेळा मुंबई येथे जाऊन आले होते. मात्र पदरी निराशा पडत होती. येथील पोलीस अधिकारी राजेंद्र हुलावळे यांना या प्रमुख आरोपीसह अन्य एका आरोपीचा सुगावा लागला होता. त्यानुसार पोलीस पथक मुंबईला रवाना झाले.
संशयीत श्रीजीत याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने इरफान यांचे नाव सांगितले. लागलीच दोघांना गुरूवारी ताब्यात घेण्यात आले. या पथकात वरील पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस हवालदार पडलीक, दुधवडकर, शिंदे यांचा समावेश होता.
या टोळीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका घरात ३ कोटी रुपये आल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या मागावर म्होरक्या श्रीजीतसह हे टोळके सिंधुदुर्गात दाखल झाले होते. जिल्ह्यात दाखल झाल्यावर या टोळक्याने त्या घराबाबत खूप चौकशी केली. अखेर या टोळक्याला करंदीकर यांच्या घराबाबत सांगण्यात आले आणि त्यांनी तिथे दरोडा टाकला असे सांगतानाच हे सर्वजण या कालावधीत कुडाळमधील एका हॉटेलमध्ये थांबले होते, असेही गेडाम यांनी यावेळी सांगितले.