नाराजांसाठी ‘इनकमिंग फ्री’-
By admin | Published: January 28, 2017 11:38 PM2017-01-28T23:38:47+5:302017-01-28T23:38:47+5:30
-वजाबाकी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर असलेले काँग्रेसचे प्राबल्य मोडीत काढण्यासाठी राज्यातील सत्ताधारी शिवसेना, भाजपने कंबर कसली आहे. नारायण राणेंना विधानसभेत पराभवाचा धक्का दिल्यानंतर आता जिल्हा परिषदेची त्यांच्या हाती असलेली सत्ता उलथवून टाकण्यासाठी शिवसेना तसेच भाजपने काँग्रेसअंतर्गत ‘नाराज’ आणि सत्ताधारी पक्षामध्ये येऊ इच्छिणाऱ्यांना गोंजारण्यास सुरुवात केली असून त्यादृष्टीने शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वाधिक इच्छुक असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष प्रयत्नरत आहेत. त्यामुळे संभाव्य बंडखोरी लक्षात घेता नारायण राणेंनी उमेदवारांची यादी तयार करूनही ती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ फेब्रुवारीपर्यंत जाहीर करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नारायण राणे यांनी काँग्रेसमधील बंडखोरी थोपविण्यासाठीची लढविलेली ही शक्कल आहे. जेणेकरून त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत स्पष्ट वाच्यता करायची नाही. कारण काँग्रेसकडे एका-एका जागेसाठी चार ते पाचजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे राणेंनी जर आधी नावे जाहीर केली तर त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसणार आहे.
सद्य:स्थितीत जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत, त्यांना अडविण्याचा अथवा त्यांची समजूत काढण्याचा कोणताही प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाकडून होताना दिसत नाही. काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पक्षासाठीची ताकद फारच कमी असल्याने आणि यासंबंधीचा आढावा नारायण राणे यांचे सध्याचे विश्वासू शिलेदार म्हणजे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, माजी जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्याकडून वेळोवेळी घेतला जात आहे आणि त्यातूनच पक्ष रणनीती ठरविली जात आहे.
काँग्रेसकडून पडद्यामागे मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू असून विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या ५0 जिल्हा परिषद सदस्यांपैकी २५ ते ३0 जागा अगोदरच ‘फायनल’ झाल्या आहेत. त्यात जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह जुन्याजाणत्या आणि प्रशासनाची माहिती असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तर काही पदाधिकाऱ्यांच्या ‘सौ’नी गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या संभाव्य मतदारसंघात शड्डू ठोकून रणनीती आखायला सुरुवात केली आहे. ग्रामपातळीवर बैठका घेतल्या जात आहेत. काहीजणांनी व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या सहाय्याने जिल्हा परिषद प्रशासनाने गेल्या दहा वर्षांत केलेली कामे आणि आपण पुढील पाच वर्षांत मतदारांसाठी काय काम करणार आहे याची जाहिरातदेखील करायला सुरुवात केली आहे. हे सर्व करत असताना त्यांना उमेदवारीची खात्री असल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी आपण लढवित असलेल्या जागांच्या वाटाघाटी करत असताना काँग्रेसने ‘ग्राऊंड लेव्हल’वर जात प्रत्यक्षात कामाला सुरुवातही केली आहे.
गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर ‘नारायणराज’ आहे. मागील दोन वर्षे वगळता राज्यात सत्ताधारी आणि मंत्रिपदावर असलेल्या नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्त्यांची ‘सेकंड’ फळी निर्माण केली आहे. या राजकीय फळीच्या आधारावरच राणे आणि सत्ता हे समीकरणच बनले होते. त्यामुळे गावातील ग्रामपंचायतीपासून थेट विधानसभेपर्यंत सर्वच ठिकाणी राणे सत्तास्थानी राहिले आहेत. केवळ सन २0१४ मध्ये देशात आलेल्या मोदीलाटेचा फटका बसल्याने नारायण राणेंच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्याचे काम सर्वप्रथम शिवसेनेकडून करण्यात आले. शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून माजी खासदार नीलेश राणे यांचा दारूण पराभव केला. यावेळी नारायण राणेंशी राजकीय शत्रूत्व पत्करलेल्या दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीत असतानादेखील शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांना निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
अगदी त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीत आमदार असलेल्या केसरकर यांना फटकारले होते. मात्र, त्यांनाही न जुमानता राणे यांच्या पुत्राचा पराभव करायचा असा चंगच केसरकर यांनी बांधला होता. त्यानंतर पुढील काही महिन्यांतच राज्यभरातील शिवसेना-भाजपची तत्कालीन लाट पाहून दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेशही केला. तसेच सावंतवाडी मतदारसंघातून निवडणूक लढवून शिवसेनेला मोठा विजय मिळवून दिला.
त्यामुळे दीपक केसरकर यांच्या रुपाने सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेला आमदार मिळाला. तर दस्तुरखुद्द नारायण राणेंना कुडाळ-मालवण मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक हे किंगमेकर ठरले. त्यांनी राणेंचा तब्बल दहा हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. नारायण राणे शिवसेनेत असताना एकेकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार आमदारांपैकी एक भाजप आणि तीन आमदार शिवसेनेचे निवडून येत होते. त्याप्रमाणे सन २0१४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील तीन आमदारांपैकी सावंतवाडी आणि कुडाळ अशा दोन मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला.
नारायण राणेंसाठी तो मोठा राजकीय धक्का होता. परंतु दैवयोगाने सन २00९ च्या निवडणुकीत अवघ्या ३४ मतांनी पराभूत झालेली कणकवली मतदारसंघातील काँग्रेसची जागा सन २0१४ च्या निवडणुकीत पटकाविण्यात काँग्रेसला यश मिळाले. त्याचे सर्व श्रेय आमदार नीतेश राणे यांना जाते. नीतेश राणे हे प्रथम कुडाळ-मालवण मतदारसंघातून विधानसभेसाठी निवडणूक लढविणार होते. कारण कुडाळची जागा नीतेश राणेंसाठी सोडणार असल्याचे नारायण राणे यांनी त्यापूर्वी वारंवार सांगितले होते. मात्र, अगदी अखेरच्याक्षणी म्हणजे निवडणुकीअगोदर एक, दीड महिना नीतेश राणे यांना राणेंनीच देवगड-कणकवली मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सांगितले. कारण राणे स्वत: कुडाळमधून लढणार होते.
नीतेश राणे सिंधुदुर्गच्या निवडणूक रिंगणात विधानसभेच्या निवडणुकीपासूनच थेट उतरले आणि पहिल्याचवेळी त्यांनी मोठे यश प्राप्त केले. माजी आमदार प्रमोद जठार यांना पराभूत करताना नीतेश राणे यांनी तब्बल २५ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य घेत मोठा विजय संपादन केला. परंतु त्याचवेळी नारायण राणे यांचा निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांची अवस्था बिकट झाली होती. नीतेश राणे यांच्या विजयाचा जल्लोष ते साजरे करू शकलेच नाही. कारण दुसरीकडे नारायण राणे यांचा पराभव झाला होता.
नारायण राणेंचा कुडाळ-मालवण मतदारसंघातून झालेला पराभव सर्व कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत झालेली हार ही काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे पक्षाचे काम न केल्याने झाली हे स्पष्ट झाले. यावेळी नारायण राणे यांचे डावे आणि उजवे म्हणून प्रसिद्ध असलेल्या काही नेत्यांनी त्यापूर्वीच्या पाच वर्षांत विविध कामांमध्ये पारदर्शकता पाळली नव्हती. लोकांमध्ये त्यामुळे राणेंविरोधात वातावरण निर्माण होण्यास हेच कार्यकर्ते, पदाधिकारी कारणीभूत होते. त्यामुळे त्याचा फटका राणेंना बसला. राणेंचा पराभव झाल्यानंतर या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना राणे कायमचा घरचा रस्ता दाखवतील आणि राजकारणातून त्यांना बाजूला करतील, असाही काहीजणांचा यामागे होरा होता. त्यातूनच राणेंचा पराभव झाला. तसेच राणेंविरोधात वातावरण निर्माण करण्यास तत्कालीन शिवसेना नेतृत्वही यशस्वी झाले होते. राणेंमुळे सिंधुदुर्गात अशांतता निर्माण झाली. राणेंची कार्यपद्धती याला कारणीभूत आहे. असा प्रचार करून शिवसेना नेतृत्वाने राणेंना धक्काच देण्याचे ठरविले होते आणि तो डावही यशस्वी झाला.
एकीकडे नारायण राणेंचा पराभव झाला होता मात्र, नीतेश राणेंनी जोरदार एंट्री केल्याने ‘कही खुशी, कही गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नारायण राणेंच्या पराभवानंतर राणेंच्या मागे-पुढे नाचणाऱ्या काहीजणांच्या राजकारणावर निर्बंध येणार ही वस्तुस्थितीच होती. त्या वस्तुस्थितीची जाणीव झाल्यानंतर तेव्हापासूनच काँग्रेसमध्ये खऱ्या अर्थाने आऊटगोर्इंग सुरू झाले. ते आऊटगोर्इंग अद्याप सुरूच आहे.
आता तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर आऊटगोर्इंग सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेत सत्तेत असताना राणेंमुळे अनेक पदे भूषविणारे पदाधिकारीही आता काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. काहीजण तिकिटासाठी तर काहीजण आपल्याला सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश मिळाल्याने आपली कामे होतील म्हणून दिवसेंदिवस इनकमिंग आणि आऊटगोर्इंगचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आखले जात आहेत.
महेश सरनाईक