अपूर्ण कामांचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Published: February 19, 2015 10:37 PM2015-02-19T22:37:09+5:302015-02-19T23:45:44+5:30

तिलारी प्रकल्प : ओटवणेत पाणी साठवणूक नाही, उन्हाळ्यात पाण्याची बोंब

Incomplete work hit farmers | अपूर्ण कामांचा शेतकऱ्यांना फटका

अपूर्ण कामांचा शेतकऱ्यांना फटका

Next

महेश चव्हाण - ओटवणे तिलारी मध्यम पाटबंधारे प्रकल्प कालव्यांची कामे पद्धतशीर न झाल्याने ओटवणे येथील स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या आधीच वन्यप्राण्यांच्या समस्येला त्रासलेल्या शेतकऱ्यांना पावसात शेतात पाणी जात असल्याने नुकसानीस सामोरे जावे लागते. तर उन्हाळ्यात कालव्यांमध्ये पाणी साठत नसल्याने शेतीला लागणारे मुबलक पाणी प्राप्त होत नाही. वन्यप्राण्यांचा त्रास व उन्हाळ्यात मुबलक पाणी नसणे, या गोष्टी शेतकऱ्याला मारक ठरत आहेत. त्यामुळे देशाच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.
ओटवणे गावात तिलारीच्या कालव्यांतून पाणी खेळणार यामुळे शेतकरीवर्ग आनंदात होता. मात्र, बरीच वर्षे प्रतीक्षा केल्यानंतरही ओटवणेवासीयांना या पाण्याची प्रतीक्षा कायम राहिलेली आहे. तिलारी मध्यम पाटबंधारे प्रकल्प कालवा हा ओटवणे गावच्या मध्यावरुन जात आहे. हरितक्रांतीच्या उद्देशाने उभारलेल्या या कालव्यात मात्र, मागील दहा वर्षात तिलारीचे पाणी पोहोचलेले नाही. परंतु, या प्रकल्पांच्या कामांमुळे ओटवणेतील ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
ओटवणे मांडवफातरवाडी भागात गतवर्षी कालवे नादुरुस्ती स्थितीमुळे पाण्याने पूर्ण भरले जात होते. डोंगरभागावरुन वाहत येणाऱ्या पाण्याला पलिकडे जाण्यासाठी वाटच उपलब्ध नसल्याने स्थानिकांना कठिण परिस्थितींना सामोरे जावे लागले होते. कालव्यात साठलेले पाणी पावसाच्या पाण्याबरोबर वाहत शेतांमध्ये घुसले होते. पावसात पाणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला होता. मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने घरांमध्येही ओल आली होती. त्यानंतर ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर यावर्षी पाईप टाकून दुरुस्ती करण्यात आली. मात्र, ओटवणे गावातील काही भागात अशा प्रकारच्या उपाययोजना न केल्याने पाणी शेतात घुसण्याचे प्रकार सुरुच होते. त्यामुळे कालव्याच्या पलिकडच्या शेतकऱ्यांना पाण्याचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे पावसाच्या अनियमिततेमुळे या शेतकऱ्यांना लावणीसाठीही पाणी मिळाले नव्हते ही पावसाळ्यातील स्थिती असते. तर उन्हाळ्यात कालव्याच्या दोन्हीकडील शेतकऱ्यांना शेतीकरिता पाण्याचा तुटवडा भासतो. यातून मार्ग काढण्याची खरी गरज आहे. एकीकडे गवारेडा, माकड यासारख्या वन्य प्राण्यांच्या रोजच्याच त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी शेतीच करायची नाही का, असा सवाल करत वन्यप्राण्यांच्या प्रश्नासह पाण्याचा प्रश्नही सोडविण्याची मागणी केली आहे. पाणी नसल्यास शेतकरी काहीच करु शकत नाही. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बारमाही शेती होऊ शकते अशा शेतजमिनी असतानाही शेतकऱ्यांना या समस्यांमुळे हातावर हात ठेऊन बसावे लागत आहे.


दुरूस्ती कामांमध्ये वाढ, मात्र ती अपूर्ण
तिलारी मध्यम पाटबंधारे प्रकल्प कालव्याचे मुख्य हौदे उघडे असल्याने पाण्याने वाहत येणारे दगड, माती, लाकडे, प्लास्टिक आदी कचराही कालव्यातून वाहत येत आहे.
त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पुढीलवर्षीही या कालव्यांची दुरुस्ती आवश्यक बनणार असून ठेकेदारांसाठी दरवर्षी दुरुस्तीसाठी येणारे कालवे लाभदायक ठरत आहेत. आणि शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना कामे आवरा, म्हणण्याची वेळ आहे.

पाण्याची चाचणीदेखील नाही
तिलारीच्या पाण्याला ओटवणे येथे आणण्यासाठी तिलारी प्रकल्पाव्दारे प्रयत्न केले जाता आहेत. मात्र, कालव्यांच्या कामांच्या फेऱ्यात अडकलेल्या तिलारी विभागाने ओटवणे येथे प्रायोगिक तत्वावरही पाणी पोहचते का नाही, याची चाचणी घेतलेली नाही. त्यामुळे या कामांबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.


पाणी साठवणूक नाही
तिलारीच्या कालव्यांची ओटवणेतील कामे निकृष्ट दर्जाची असल्याने पाणी साठवणूक क्षमता या कालव्यांमध्ये नाही. कालव्याच्या हौद्याचे बांधकाम पूर्णत: सिमेंट काँक्रिटचे असल्याने जमिनीत पाणी जिरुन पाण्याची पातळी वाढण्याची शक्यताही नाही.

Web Title: Incomplete work hit farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.