आधुनिक शेतीतून आर्थिक उत्पन्न वाढवा
By admin | Published: February 19, 2015 10:39 PM2015-02-19T22:39:37+5:302015-02-19T23:45:37+5:30
वैभव नाईक : सिंधु कृषी महोत्सवास प्रारंभ, २२ पर्यंत विविध कार्यक्रम
ओरोस : शेतीबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी सिंधु कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कृषी विषयक मार्गदर्शन घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करून आर्थिक उत्पन्न वाढवा व सिंधुदुर्ग जिल्हा सुजलाम सुफलाम बनवा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी सिंधु कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस संचलित छत्रपती शिवाजी कृषी विद्यालय आयोजित सिंधु कृषी महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोसचे अध्यक्ष ब्रिगेडीअर सुधीर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी छत्रपती शिवाजी कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरून ओरोस फाटा तर ओरोस फाटा ते शरद कृषी भवन येथे शिवज्योत आणून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी गडहिंग्लजच्या लेझीम पथकाने आपल्या कलाकौशल्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतजमिनी पडीक ठेवत आहेत. शेती सोडून नोकरीकडे त्यांचे लक्ष केंद्रीय झाले आहे. परिणामी शेतजमिनींच्या पडीक क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांमध्ये शेतीबाबत जनजागृती करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, कृषी प्रतिष्ठान किर्लोसच्यावतीने १९ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत सिंधु कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध कृषीविषयक प्रशिक्षणे व मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून कृषीविषयक मार्गदर्शन घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करा. या शेतीतून आर्थिक उन्नती साधा व सिंधुदुर्ग जिल्हा सुजलाम, सुफलाम बनवा असे आवाहन केले.
सुधीर सावंत म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यास आधुनिक आणि प्रगत कृषी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. उत्पादन क्षमता व कृषीमालाचा दर्जा वाढविल्यावरच कृषी मालातून मिळणारे उत्पन्न वाढू शकते. तसेच बरेच शेतजमिनींचे मालक शहरात रहात असल्याने असल्या शेतजमिनी विकत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शेती टिकावी, शेतकरी रहावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानने कृषी औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. ज्या शेतकऱ्यांना शेती करणे शक्य नाही त्यांच्या शेतात त्यांच्याच सहभागाने कृषी प्रतिष्ठान जमिनी नांगराखाली आणेल. यामध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन, ऊस लागवड, कृषी माल प्रक्रिया व विक्री तसेच महिला सक्षमीकरण आदींचा विशेष समावेश असणार असून यासाठीच सिंधु कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले
आहे. (वार्ताहर)