शुभवर्तमान! सिंधुदुर्गची मुलींच्या जन्मदरात सरशी, आरोग्य विभागाचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 05:59 PM2022-05-14T17:59:19+5:302022-05-14T17:59:44+5:30
जानेवारी ते एप्रिल २०२२ या चार महिन्यामध्ये जन्मलेल्या एकुण १९९४ नवजात बालकामध्ये ४४ एवढ्या मुली अधिक जन्मल्याचे स्पष्ट झाले आहे.
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल २०२२ या चार महिन्यात जन्मलेल्या एकुण १९९४ नवजात बालकांमध्ये मुलांपेक्षा ४४ मुली अधिक जन्मल्याचे स्पष्ट झाले आहे. मुले ९७५ तर मुली १०१९ एवढ्या जन्मल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल २०२२ या चार महिन्यामध्ये जन्मलेल्या एकूण १९९४ बालकांमध्ये जानेवारी २४१ मुले, २७५ मुली, फेब्रुवारीत २२६ मुले, २२२ मुली, मार्च २५९ मुले, २८१ मुली, तर एप्रिलमध्ये २४९ मुले व २४१ मुली अशा एकूण १९९४ नवजात बालकांचा जन्म झाला असून त्यामध्ये ४४ मुली अधिक जन्मल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छता, शिक्षण, यासारख्या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपाय योजना केल्या जात असल्या तरी मुलींचे जन्म प्रमाण मुलांपेक्षा कमीच राहिले आहे. मात्र २०२२ हे वर्ष त्याला अपवाद असून यावर्षी मुलांपेक्षा गेल्या चार महिन्यात मुली अधिक जन्मल्या आहेत.
मुलांपेक्षा ४४ मुली अधिक
जिल्ह्यात मुलींच्या जन्माबाबत जनजागृती केली जात आहे. प्रशासन व जनतेकडूनही मुला-मुलींचे स्वागत होऊ लागले आहे. विविध उपाययोजना, शासकीय योजनेचा लाभ मुलींच्या जन्मानंतर दिले जात आहेत. तरी मुलींच्या जन्माचे प्रमाण मुलांच्या जन्मप्रमाणाशी बरोबरी करू शकले नव्हते. मात्र जानेवारी ते एप्रिल २०२२ या चार महिन्यामध्ये जन्मलेल्या एकुण १९९४ नवजात बालकामध्ये ४४ एवढ्या मुली अधिक जन्मल्याचे स्पष्ट झाले आहे.