आंगणेवाडीतील श्री भराडी देवी एसटी महामंडळास पावली; मालवण, कुडाळ आगारास झाला 'इतक्या' लाखांचा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 05:45 PM2023-02-07T17:45:14+5:302023-02-07T17:45:35+5:30
चालक, वाहकांनी अहोरात्र मेहनत घेतल्यामुळे एसटी बस सेवा सुरळीत
मालवण : श्री आंगणेवाडी श्री भराडी देवी यात्रा मार्गावर मालवण आगारातून ४५ एसटी बसच्या माध्यमातून विविध गावांतून दोन दिवस सतत फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. यातून मालवण आगारास ७ लाख २५ हजार ४४ रुपये उत्पन्न मिळाले आहे. अशी माहिती आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी सोमवारी दिली आहे.
जादा वाहतुकीच्या माध्यमातून मालवण आगाराकडून १२ हजार १७८ किमी चालवून त्यातून ७ लाख २५ हजार ४४ रुपये उत्पन्न मिळाले. ५९.५४ पैसे प्रति किमी उत्पन्न व ९३.३६ एवढे भारमान मिळाले.
विभाग नियंत्रक प्रशांत वासकर व विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या जादा गाड्या व फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले. यात्रा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी चालक, वाहक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. चालक, वाहकांनी अहोरात्र मेहनत घेतल्यामुळे एसटी बस सुरळीत सेवा देवू शकल्याचे ते म्हणाले.
यात्रा कालावधीत कोणतीही रा. प. बस मार्गस्थ बिघाड न झाल्याने यांत्रिक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यात्रा मार्गावर २७ हजार ३२१ भाविकांनी बस वाहतुकीचा लाभ घेतला. त्याबद्दल आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी आभार मानले आहेत.
कुडाळ आगाराला साडेपाच लाखांचे उत्पन्न
कुडाळ आगारामार्फत तालुक्यातील विविध गावांतून २७ गाड्या आंगणेवाडीसाठी धावल्या. जादा वाहतुकीच्या माध्यमातून कुडाळ आगाराकडून ८ हजार १६ किमी चालवून त्यातून ५ लाख ६८ हजार ५७९ रुपये उत्पन्नातून ७०.३० प्रती किमी उत्पन्न आणि ११६:१२ एवढे भारमान मिळाले.
आंगणेवाडीमध्ये विशेष बससेवेसाठी ४ बसेस त्यातून उत्पादित किमी ५१४ व अनुत्पादित किमी ६८६ चालविण्यात आले. यामधून ६६ हजार रुपये उत्पन्न मिळाले. प्रती किमी ५५ उत्पन्न व ९९.०४ एवढे भारमान मिळाले. भाविकांसाठी एकूण २३ एसटी बसचा वापर करून ११० बसफेऱ्या सोडण्यात आल्या. यामधून ५ लाख २५७९ एवढे उत्पन्न कुडाळ आगारास प्राप्त झाले, तर प्रती किमी ७३.७ एवढे उत्पन्न व १२०.७१ भारमान मिळाले.
यासाठी एकूण २७ चालक व २३ वाहक असे एकूण ५० कर्मचारी यांचा वापर करण्यात आला. यात्रा विभाग नियंत्रक प्रशांत सुभाष वासकर व विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.