सिंधुदुर्गात पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ, वीजरोधक यंत्रणा कागदपत्रावरच
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 24, 2024 07:09 PM2024-06-24T19:09:09+5:302024-06-24T19:09:29+5:30
प्रशासनाने जागृत होणे गरजेचे
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात दरवर्षी वीज पडण्याच्या घटना घडत असतात. मागील आठवड्यात वीज कोसळून काही घरांचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरवर्षी जिल्ह्यात पावसाळ्यात वीज पडून काही जणांचा मृत्यू होतो. अनेकवेळा पाळीव जनावरांनाही वीजेचा फटका बसतो.
मुसळधार पाऊस पडत असला की त्यासोबत विजांचा कडकडाट सुरू होतो, अशा वेळी वीज पडण्याच्या घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशा घटना टाळण्यासाठी वीजरोधकयंत्र हे उपयोगी पडते. मात्र, सिंधुदुर्गात ही यंत्रणा काही वर्षांपासून शासकीय कागदपत्रावर आहे. संपूर्ण जिल्ह्याची हीच परिस्थिती आहे.
वीजरोधक यंत्र म्हणजे काय?
- पावसाळा, वादळ या काळात मोठ्या प्रमाणात विजा कडाडतात. अनेकदा वीज ही कुठे ना कुठे पडत असते. यामुळे जीवितहानी होत असते. विजांमुळे वित्तहानी होण्याचे प्रमाणही अधिक असते.
- या पार्श्वभूमीवर वीज पडणार असेल तर ती आधीच रोखण्यासाठी वीजरोधक हे यंत्र उपयोगी पडते. त्यामुळे वीज जमिनीवर न पडता या यंत्राद्वारे रोखली जाऊन जीवितहानी टाळली जात असते.
असा होतो परिणाम
वीजरोधक यंत्रणा कार्यान्वित असेल तर वीज पडण्यापासून संरक्षण होते. वीज पडणार असेल तर आधीच या यंत्रणेने खेचली जाते. तसेच या यंत्रणेमुळे दोन किलोमीटर परिसरात वीज पडत नाही.
पाच वर्षांत जिल्ह्यात वीज पडून काही जणांचा मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच वर्षात पाचपेक्षा जास्त जणांचा जीव गेला आहे. दरवर्षी वीज पडण्याच्या अनेक घटना घडत असतात. यातील काही घटनेत जीवितहानी टळते.
यंत्रणा कार्यान्वित का होत नाही?
राज्य शासनाकडे याबाबत प्रस्ताव पाठविला होता. जिल्ह्यासाठी आपत्ती रोखण्यासाठी कोट्यावधी निधीची गरज आहे. या निधीच्या माध्यमातून आपत्तीची कामे सुरू केली जाणार आहेत.