कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे :के. मंजुलक्ष्मी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 05:55 PM2021-03-10T17:55:50+5:302021-03-10T17:57:49+5:30
corona virus sindudurg- कोरोनाचा प्रादुर्भाव नव्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोविड - १९ च्या चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या शोध घेण्यावरही भर देण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहामध्ये कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी त्या बोलत होत्या.
ओरोस : कोरोनाचा प्रादुर्भाव नव्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोविड - १९ च्या चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या शोध घेण्यावरही भर देण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहामध्ये कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी त्या बोलत होत्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वंदना खरमाळे, वैशाली राजमाने यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, पोलीस अधिकारी व संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कोरोनाच्या या सध्याच्या परिस्थितीमध्ये आरोग्य व महसूल विभागास लागेल ती सर्व मदत करण्यास पोलीस विभाग सज्ज आहे, असे सांगितले. तसेच त्यांनी पोलीस विभागाच्या लसीकरणाचीही माहिती यावेळी दिली.
लसीबाबतचे लोकांमधील गैरसमज दूर करावेत
जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना देऊन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी पुढे म्हणाल्या की, जास्तीत जास्त वेळ लसीकरण सुरू राहील या दृष्टीने नियोजन करावे. लोकांमधील लसीविषयीचे गैरसज दूर करून जास्तीत जास्त लोक लसीकरणासाठी येतील यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर स्वॅब घेण्याचे नियोजन करावे.
गृह अलगीकरणात असताना रुग्ण जर नियमांचे पालन करत नसेल तर त्यास थेट संस्थात्मक अलगीकरणात ठेवावे. त्यासाठी शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्रांची संख्या वाढवावी. त्यासाठी शासकीय संस्था अधिग्रहित कराव्यात. कोविड केअर सेंटरसाठीच्या जागा निश्चित करण्यात याव्यात.