सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंध-अपंगाच्या संख्येत वाढ, औषध कंपन्यांसह डॉक्टर जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 05:45 PM2018-03-15T17:45:56+5:302018-03-15T17:45:56+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिओ व अंध-अंपगांची संख्या कमी होेण्यापेक्षा ती दिवसेंदिवस वाढत असून याला जबाबदार औषध कंपन्या व डॉक्टर असल्याचा गंभीर आरोप महालक्ष्मी अंध- अपंग सामाजिक संघटनेचे अध्यक्ष हरी गावकर यांनी केला आहे.
सावंतवाडी : जिल्ह्यात पोलिओ व अंध-अंपगांची संख्या कमी होेण्यापेक्षा ती दिवसेंदिवस वाढत असून याला जबाबदार औषध कंपन्या व डॉक्टर असल्याचा गंभीर आरोप महालक्ष्मी अंध- अपंग सामाजिक संघटनेचे अध्यक्ष हरी गावकर यांनी केला आहे.
अंध-अपंग बांधवाच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनीे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंध-अपंग बांधवांच्यावतीने २८ मार्च रोजी येथील प्रांताधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार असल्याचेही जाहीर केले.
गावकर म्हणाले, अंध बांधवांना आपल्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी भांडावे लागत आहे. अंधबांधवांचे हक्क डावलण्यात येत असून आमच्यावर अन्याय होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून देण्यात येणाऱ्या तीन टक्के अपंग निधीतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येत असून प्रत्यक्षात आम्हाला दीड टक्का निधीच वाटप करण्यात येत आहे. उर्वरित दीड टक्का निधी संगनमताने लाटला जातो.
जिल्ह्यात तीन टक्के राखीव जागांवर आज अधिकाऱ्यांची मुले भरती करण्यात आली आहेत. तसेच यातून अपंगांना डावलण्यात आले आहे ही वस्तूस्थिती आहे. त्याचा शासन स्तरावरून शोध घेण्यात यावा. डॉक्टर व औषध कंपन्यांच्या साटेलोट्यामुळे अंपगत्वात वाढ होत आहे.
डॉक्टरांकडून रूग्णांना देण्यात येणारी औषधे चांगल्या दर्जाची दिली जात नसल्याने मूकबधीर, मतिमंदत्व अशा प्रकारच्या रोगांना प्रोत्साहन मिळत आहे. यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आज रस्त्याचा कामात होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे.
रस्त्याच्या साईटपट्ट्या, कच्चे गटार, दिशादर्शक फलक, डांबराचे अल्प प्रमाण व अंदाजपत्रकानुसार न करण्यात येणारी कामे यामुळे रस्ता काही काळातच खराब, होऊन रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अपघात होऊन अपंगत्वाचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.
या सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी २८ मार्चला प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणाार आहे. या मोर्चासाठी आमदार बच्चू कडू यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे, असे संघटेनेचे सल्लागार सुनील पेडणेकर यांनी सांगितले.
यावेळी संघटनेचे सल्लागार सुनील पेडणेकर, आत्माराम परब, विठ्ठल शिरोडकर, उमेश कोरगावकर, सत्यवान वारंग, राधाबाई नाईक आदी उपस्थित होते.
स्वतंत्र रेशन कार्ड द्या!
अपंगांच्या समस्यांवर आमदार, खासदार यांचे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे आम्हा अंपगांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिवसेंदिवस वाढणारी महागाई व महागड्या सेवा सवलती यामुळे मोठा फटका अपंगांना सोसावा लागत आहे. त्यामुळे शासनाने अपंगांना स्वतंत्र रेशन कार्ड द्यावे, अशी मागणी यावेळी अंध-अंपग बांधवांनी बोलून दाखविली.
अपंग निधीत वाढ करा
शासनाकडून राज्यातील अपंगाना देण्यात येणारा संजय गांधी अपंग निधी हा ६०० रूपये एवढा तुटपुंजा देण्यात येतो. त्यात वाढ करून तो गोवा, कर्नाटक, राज्याच्या धर्तीवर २ हजार रूपये एवढा देण्यात यावा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.
महालक्ष्मी अंध-अंपग सामाजिक संघटनेच्या अंध बांधवांनी एकत्र येत अपंगाच्या समस्या मांडल्या.