शिक्षणाचे व्यापारीकरण वाढतेय

By admin | Published: February 20, 2015 09:38 PM2015-02-20T21:38:28+5:302015-02-20T23:14:59+5:30

भालचंद्र मुणगेकर : कुडाळ येथील चर्चासत्रात मार्गदर्शन

Increasing commercialization of education | शिक्षणाचे व्यापारीकरण वाढतेय

शिक्षणाचे व्यापारीकरण वाढतेय

Next

कुडाळ : शिक्षण क्षेत्राच्या खासगीकरणाबरोबरच व्यापारीकरण वाढत असल्याने यापुढे ज्याच्या हातात काळा पैसा नाही, ती व्यक्ती आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊ शकणार नाही. शिक्षणाच्या वाढत्या व्यापारीकरणामुळे हे चित्र भविष्यात दिसून येणार असल्याची खंत खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. ते बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे आयोजित ‘आजच्या शिक्षण पद्धतीसमोरील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यान आणि खुल्या चर्चासत्रात ते बोलत होते. बॅ. नाथ पै बी.एड्. कॉलेज व बॅ. नाथ पै कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आजच्या शिक्षण पद्धतीसमोरील आव्हाने’ या विषयावर मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा खासदार, देशाचे नियोजन मंडळाचे सदस्य, थोर अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे गुरुवारी मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. यावेळी कुमार कदम, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, गोगटे वाळके कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. बी. सावंत, कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. वजराटकर, माणगाव हायस्कूलचे प्राचार्य प्रशांत धोंड, श्री देवी सातेरी हायस्कूल आणि गुलाबबाई नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका स्वाती वालावलकर, आदी उपस्थित होते.डॉ. मुणगेकर म्हणाले, १८८५ पासून भारताच्या शिक्षणाचे शिल्पकार लॉर्ड मेकॉले त्यांनी कारकुनी थाटाचे शिक्षण सुरू केले. १९८५ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी थोडा बदल करून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केला. आपल्याकडे गरीब लोक शिक्षण घेऊ शकले याचे कारण फुले, आंबेडकर आणि शाहू यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक चळवळी. या देशातील स्त्रियांनी केलेली प्रगती ही सर्वांत मोठी प्रगती आहे. आजच्या शिक्षण पद्धतीबाबत ते म्हणाले, आज शिक्षणाचे बाजारीकरण आणि खासगीकरण झाले आहे.बाजारीकरणामुळे एमडीसाठी आज एक ते दीड कोटी रुपये फी म्हणून मागितले जातात. याचा परिणाम म्हणजे ज्याच्याजवळ पैसे नाहीत, तो पालक आपल्या पाल्याला उच्च व्यावसायिक शिक्षण देऊ शकणार नाही. काही लोक इतर शिक्षणातून मिळालेले पैसे दुसरीकडे वापरतात, अशी स्थिती आहे. आज शिक्षण व्यवस्थेत शारीरिक श्रमाला महत्त्व नाही, ही शोकांतिका आहे. आज सरकारचा उच्च शिक्षणावरचा खर्च कमी होत चालला आहे. यात सरकारला दोष देण्यात अर्थ नाही. देशात सरकार आणि राजकारण या गोष्टी अपरिहार्य आहेत. आपला आशावाद मोठा पाहिजे. यासंदर्भात ते म्हणाले, नेपोलियनचा साम्राज्यवाद जेवढा मोठा होता, तेवढाच छोटेसे राज्य असूनही शिवाजी महाराजांचा साम्राज्यवाद मोठा आहे. खासगीकरण, बाजारीकरण, गुणवत्तेचा अभाव, बंधुभावाचा अभाव अशा प्रकारची आव्हाने आजच्या शिक्षण पद्धतीसमोर आहेत. याला पर्याय म्हणून नवीन राष्ट्रवाद, व्यावसायिक शिक्षण, स्त्री -पुरुष समानता अशी शिक्षण पद्धती असावी. जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, अशी सामाजिक जाणीव शिक्षणातून निर्माण झाली पाहिजे. सामाजिक भावना हा
विकासशील मानवी जीवनाचा आत्मा आहे.
यानंतर झालेल्या चर्चासत्रातील प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करावा; पण टेक्नॉलॉजीच्या आहारी जाऊ नये. तसेच पालकांनी आपल्या पाल्याला शिक्षणासाठी उत्तेजन द्यावे; पण अभ्यासक्रम त्यांच्यावर लादू नये. याबाबत त्यांना उद्बोधन करण्याची गरज आहे. अजूनही देशातील अनेक गावांमध्ये तंत्रज्ञान पोहोचलेले नाही, असेही ते म्हणाले.
तसेच खासदार मुणगेकर म्हणाले, खासगीकरण, उच्च शिक्षणासाठी समर्थनीय आहे. मात्र, व्यापारीकरण होऊ नये. शिक्षण व्यवस्थेचा उपयोग सामाजिक जाणिवा निर्माण करण्यासाठी झाला पाहिजे. भारतात सोडून जगात बी.कॉम. ही डिग्री नाही. तर अमेरिका देशात
प्यून हे पद नाही. स्वत:ची कामे स्वत: करता आली पाहिजेत, असे ते
म्हणाले.
यावेळी बी. एड्.च्या प्राचार्या दीपाली काजरेकर, नागराज सुनगार, प्रा. रूपाली नार्वेकर, पौर्णिमा दाभोलकर, प्रा. सचिन पाटकर, आदी उपस्थित होते. पौर्णिमा दाभोलकर यांनी सूत्रसंचालन केले, तर श्वेता खानोलकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Increasing commercialization of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.