मागासवर्गीय वस्त्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:02 PM2021-06-04T16:02:41+5:302021-06-04T16:04:51+5:30
CoronaVirus Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागासवर्गीय वस्त्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी सदस्य अजिंक्य पाताडे यांनी सभेत केली. दरम्यान, याकडे जिल्हा परिषद अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधा, असे आदेश सभापती अंकुश जाधव यांनी दिले. तसेच या विभागाचा ऑक्टोबरमध्ये १०० टक्के खर्च होईल, असे नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली.
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागासवर्गीय वस्त्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी सदस्य अजिंक्य पाताडे यांनी सभेत केली. दरम्यान, याकडे जिल्हा परिषद अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधा, असे आदेश सभापती अंकुश जाधव यांनी दिले. तसेच या विभागाचा ऑक्टोबरमध्ये १०० टक्के खर्च होईल, असे नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली.
जिल्हा परिषद समाज कल्याण समिती सभापती अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने सभा संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी शाम चव्हाण, सदस्य अजिंक्य पाताडे, मानसी जाधव, राजलक्ष्मी डीचवलकर, संजय पडते, अधिकारी आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. यात जास्तकरून मागासवर्गीय वस्त्यांमध्ये हे रुग्ण आढळून येत असल्याचे मालवण सभापती अजिंक्य पाताडे यांनी सांगत याकडे लक्ष वेधले. यावर उपाययोजना करण्याची मागणी सभेत केली. तसेच या वस्त्यांमध्ये कोरोना आजारावर जनजागृती करण्याची सूचना केली. याकडे जिल्हा परिषद अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधून ठोस पावले उचलण्यात यावी, अशी सूचना सभापती अंकुश जाधव यांनी सभेत केली.
अपंग कल्याण निधी १०० टक्के खर्च झाला पाहिजे
समाजकल्याण विभागाच्या २० टक्के सेस व ५ टक्के अपंग कल्याण निधीअंतर्गत येणाऱ्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. तसेच आणखी प्रस्ताव मागविण्याची सूचना सभापती जाधव यांनी केली. दरम्यान, या विभागाचा निधी ऑक्टोबर २०२१पर्यंत १०० टक्के खर्च झाला पाहिजे. त्यानुसार नियोजन करा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
दिव्यांगांना स्वयंचलित वाहनांचा लाभ द्या
अपंग कल्याणअंतर्गत दिव्यांगांना स्वयंचलित वाहन (मोटारसायकल) देण्यात येते. याचा काहींना लाभ मिळाला आहे, तर काहींना अद्याप मिळाला नाही. त्यांचे फोन आपल्याला येत आहेत. त्यामुळे उर्वरित दिव्यांगांना स्वयंचलित वाहनांचा त्वरित लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेश सभापती अंकुश जाधव यांनी दिले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचे निकाल त्वरित जाहीर करण्याची सूचना केली.