जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप: सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, कार्यालयीन कामकाज ठप्प
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: December 14, 2023 04:24 PM2023-12-14T16:24:25+5:302023-12-14T16:25:02+5:30
१७ हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग
सिंधुदुर्ग : जुनी पेन्शन मिळालीच पाहिजेचा नारा देत राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गुरुवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्याचप्रमाणे राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात शेकडोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.
जुन्या पेन्शन या कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागणीसह रिक्त पदे भरती, आठव्या वेतन आयोगाचे तत्काळ गठन करणे, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या तत्काळ करणे व इतर १८ मागण्यांसाठी राज्यातील १७ लाख कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. या संपकरी कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत धरणे आंदोलन केले. यावेळी विविध प्रकारच्या घोषणा देऊन येथील परिसर दणाणून सोडला.
१७ हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग
आजच्या या संपात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व महसूल, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आयटीआय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, वस्तू सेवा कर या सह सर्व विभागांचे १७ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत.
कार्यालयीन कामकाज ठप्प
राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले असल्याने सरकारी कार्यालयातील सर्व कामे ठप्प झाली आहेत. जिल्हास्तरावर कामासाठी आलेल्या नागरिकांना मात्र आपले काम झाल्याशिवाय मागे परतावे लागले.