आमदारांच्या स्वतंत्र भूमिकेने प्रश्न रखडले
By admin | Published: January 3, 2016 09:43 PM2016-01-03T21:43:06+5:302016-01-04T00:51:02+5:30
राजन तेलींचा आरोप : एकनाथ खडसे लवकरच जिल्ह्यात येणार
कणकवली : आचरा देवस्थान इनाम जमिनीचा प्रश्न आणि मच्छिमारांतील वाद याबाबत मंत्रीस्तरावर प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत असताना आमदार वैभव नाईक यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने प्रश्न सुटण्यास वेळ लागत आहे. लवकरच याप्रश्नी महसूलमंत्री एकनाथ खडसे सिंधुदुर्गात येणार असल्याची माहिती भाजपाचे सरचिटणीस राजन तेली यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. राजन तेली म्हणाले की, आचरा देवस्थान इनाम प्रश्न अनेक वर्षे रखडलेला आहे. या प्रश्नावर आंदोलन झाले तेव्हा मी आंदोलकांना भेटलो होतो. जुलै महिन्यात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे माधव भांंडारी, प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यासह मी हा प्रश्न घेऊन गेलो. त्यांनी याबाबत संबंधित अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक लावण्याचे निश्चित केले. मात्र, आमदार वैभव नाईक त्यानंतर राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन गेले. दोन पक्षांतील वाद लोकांसमोर येऊ नये यासाठी राज्यमंत्र्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहिली. त्या बैठकीसाठी काही ग्रामस्थांसह मीही गेलो. परंतु, दुर्दैवाने ती बैठक होऊ शकली नाही. आता मी महसूलमंत्र्यांना आचरा तसेच त्यासारखे काही देवस्थानांचे प्रश्न सोडविण्यास मदत करण्याची विनंती केली आहे.
अशाच प्रकारे मच्छिमारांतील वादातही नाईक यांनी समन्वय न साधता वेगळे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पर्ससीन व पारंपरिक मच्छिमारांतील वादात कायमस्वरूपी निर्णय व्हावा म्हणून गणेशोत्सवापूर्वी पारंपरिक मच्छिमारांच्या शिष्टमंडळासह मी माधव भांडारी, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, विकी तोरसकर, महेंद्र पराडकर आदी मंडळींच्या उपस्थितीत महसूलमंत्री खडसे यांच्याबरोबर मुंबईत बैठक झाली. पुन्हा पुन्हा घुसखोरी करणाऱ्यांवर टाडासारखा गुन्हा नोंदविण्यात यावा, गस्तीनौकांना लवकरात लवकर मंजुरी द्यावी, आदी सूचना केल्या. या बैठकीत ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यास मंत्रीमहोदयांनी तत्त्वत: मान्यता दिली. मात्र, आमदार वैभव नाईक हे दोनच दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना शिष्टमंडळ घेऊन भेटले. (प्रतिनिधी)
समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज
अनेक वर्षे प्रलंबित प्रश्नांबाबत समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज असून, कोणीही राजकारण आणू नये. याबाबत महसूलमंत्र्यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले असून, त्यापूर्वी मंत्रालयात बैठक घेतली जाणार आहे, असे राजन तेली यांनी सांगितले.