सिंधुदुर्ग : कुडाळात ४ आॅगस्टपासून सिंधु एज्युकेशन एक्स्पो २०१८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 06:06 PM2018-08-01T18:06:44+5:302018-08-01T18:10:30+5:30
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने प्रथमच सिंधु एज्युकेशन एक्स्पो २०१८ चे आयोजन ४, ५ व ६ आॅगस्ट रोजी कुडाळ येथे करण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील व राज्यातील विविध नामांकित शैक्षणिक संस्थांचे ६० स्टॉल सहभागी होणार आहेत.
कुडाळ : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने प्रथमच सिंधु एज्युकेशन एक्स्पो २०१८ चे आयोजन ४, ५ व ६ आॅगस्ट रोजी कुडाळ येथे करण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील व राज्यातील विविध नामांकित शैक्षणिक संस्थांचे ६० स्टॉल सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई तसेच शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा एक्स्पो जिल्ह्यातील सर्वात मोठा शैक्षणिक एक्स्पो ठरणार असून, सुमारे १५ हजार विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. एक्स्पोच्या आयोजनाबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने कुडाळ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कुडाळचे सभापती राजन जाधव, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरीश जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक खडुस, प्राथमिक शिक्षणाधिकारी भारती संसारे, कुडाळचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी रणजित देसाई म्हणाले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अध्यापन पध्दत, भौतिक सुविधा, लोकसहभाग, उपक्रम, शिक्षकांचे शैक्षणिक उपक्रम यामध्ये विद्यार्थ्यांनी साधलेल्या यशस्वीतेच्या गाथा यांना योग्य व व्यापक प्रसिध्दी देऊन जास्तीत जास्त पालक व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांकडे आकर्षित करणे तसेच जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना तसेच शिक्षणप्रेमींना शालेय विषयांच्या पलीकडे जाऊन व्यवसाय, उद्योग, प्रशिक्षणाच्या संधी याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना सध्या उपलब्ध असलेल्या काही शिक्षणसंधींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन करणे, विषय निवड व व्यवसाय निवड प्रक्रियेची पूर्वतयारी करण्यासाठी मदत करणे, विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी माहिती उपलब्ध करून देणे या उद्देशाने ह्यसिंधु एज्युकेशन एक्स्पो २०१८ह्णचे आयोजन करण्यात आले आहे.
एक्स्पोमध्ये शैक्षणिक व करिअर मार्गदर्शन संदर्भात विविध प्रकारचे ६० स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील विविध नामांकित शैक्षणिक संस्थांचे स्टॉल या एक्स्पोमध्ये पाहण्यास व माहिती घेण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर राज्यातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
५ आॅगस्ट रोजी सांगलीचे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी महेश चोथे करिअर निवडण्याची सप्तसूत्री या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच शास्त्रज्ञ विजय आरोलकर (टाटा इन्स्टिट्युट आॅफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई) मार्गदर्शन करणार आहेत. आयसर पुणेचे शास्त्रज्ञ अरविंद नातू यांचे व्याख्यान होणार आहे.
६ रोजी कोल्हापूर विभागाचे निवृत सहाय्यक शिक्षण संचालक संपत गायकवाड यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच विद्यार्थी, पालक, वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्यामध्ये चर्चासत्र होणार आहे. ४ व ५ आॅगस्ट विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एज्युकेशन एक्स्पोनिमित्त कडाळ ते कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन ४ आॅगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते होणार असून, यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्ह्यातील खासदार, आमदार व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देसाई यांनी दिली. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणप्रेमी व जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न : रेश्मा सावंत
जिल्हा परिषद शाळेत सध्या पटसंख्या कमी होत आहे. या अनुषंगाने एक्स्पोच्या माध्यमातून शाळांतील विद्यार्थी पटसंख्या वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे रेश्मा सावंत यांनी सांगितले. तसेच दहावी, बारावी, शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या डॉ. अब्दुल कलाम टॅलेंट परीक्षेत यश मिळविलेल्या ४८ विद्यार्थ्यांचा गौरव या एक्स्पोमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत लहान-मोठे असे अनेक शैक्षणिक एक्स्पो झाले आहेत. मात्र हा एक्स्पो जिल्ह्यातील सर्वात मोठा शैक्षणिक एक्स्पो ठरेल, असा विश्वास रणजित देसाई यांनी व्यक्त केला.