सिंधु रत्न समृद्धी योजना फसवी, नव्या बाटलीत जुनी दारू : राजन तेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:24 PM2021-04-02T16:24:54+5:302021-04-02T16:30:42+5:30
Bjp Sindhudurg rajanteli- योजनेचे नाव बदलून सिंधु -रत्न समृद्धी योजना ठेवण्यात आले असून ती फसवी आहे. ही योजना म्हणजे 'नवीन बाटली आणी जुनीच दारू' असल्याची टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे .
कणकवली : सिंधू - रत्न समृद्धी योजनेत सिंधुदुर्गातून ७५ कोटींचे सार्वजनिक हिताचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस सरकारच्या 'चांदा ते बांदा' या योजनेतून सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी १९३ कोटींचा निधी दिला होता . त्यापैकी १०१ कोटी खर्च झाले तर ९२ कोटी रुपयांचा निधी ठाकरे सरकारने मागे घेतला. त्याच योजनेचे नाव बदलून सिंधु -रत्न समृद्धी योजना ठेवण्यात आले असून ती फसवी आहे. ही योजना म्हणजे 'नवीन बाटली आणी जुनीच दारू' असल्याची टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे .
कणकवली येथील भाजप कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजन तेली म्हणाले, शेतकरी , मच्छीमार , महिला बचतगट यांना रोजगारातून आर्थिक उन्नती मिळवून देणे हा चांदा ते बांदा योजनेचा गाभा होता . मात्र ,अर्थमंत्री अजित पवार यांनी ती योजना बासनात गुंडाळून सिंधु-रत्न समृद्धी योजना आणली . मात्र, मागील सव्वा वर्षात एकही रुपया खर्च केला नाही . ही योजना म्हणजे नवीन बाटली जुनी दारू असल्याचा टोला तेली यांनी लगावला .
पर्यटन वाढीला चालना न देता कोकणच्या विकासाला खीळ घालण्याचे काम ठाकरे सरकार करत आहे . मागील सव्वा वर्षात जिल्ह्याचा आराखडा वाढण्याऐवजी कमी करण्यात आला . सन २०१९-२० मध्ये असलेला २२५कोटींचा आराखडा आता १४३ कोटींवर आणला . त्यातही फक्त ३३ टक्के निधी आला . हा निधी ४७ कोटी १९ लाख रुपये होता . जिल्ह्यात आलेल्या ३३ टक्के निधींपैकी २५ टक्के म्हणजे ११ कोटी ७९ लाख ७५ हजार रुपयांचा निधी कोव्हीडसाठी राखीव ठेवण्यात आला .
शासनाने चांदा ते बांदा योजनेतील शिल्लक अखर्चित निधीही मागे घेतला. कोकणाने शिवसेनेला सत्ता दिली . मात्र, कोकणवरच शिवसेना अन्याय करीत आहे . अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार अजून झाले नाहीत . कोरोना काळात नियुक्त कंत्राटी डॉक्टरांचे ६ महिने मानधन नाही. पालकमंत्र्यांचा प्रशासनावर अंकुश नाही.जिल्हा परिषदेचा निधी अखर्चित राहण्याला पालकमंत्री उदय सामंत कारणीभूत असल्याची टीका तेली यांनी केली.
ते पुढे म्हणाले, सिंधुरत्न समृद्धी योजनेचा फायदा सिंधुदुर्गवासीयांना होणार नाही.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शासन निधी आणणार कुठून ? जिल्ह्यात आरोग्य विभागाची ५३६ पदे रिक्त आहेत . ती कधी भरणार ? हे शासनाने जाहीर करावे.तसेच एन.आर.एच. एम. मधील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करावे अशी मागणीही तेली यांनी यावेळी केली .