कणकवलीत नव्या राजकीय समीकरणांचा 'उदय', राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या
By सुधीर राणे | Published: September 27, 2022 04:43 PM2022-09-27T16:43:34+5:302022-09-27T16:44:35+5:30
कणकवली नगरपंचायतची थेट नगराध्यक्ष निवडणूक असून, या निवडणुकीच्या निमित्ताने ही नवीन राजकीय समीकरणे जुळवली जात असल्याची चर्चा.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या आणि राजकारणात नेहमीच लक्षवेधी ठरलेल्या कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीला आता अवघे काहीच महिने शिल्लक राहिले आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात नवीन राजकीय समीकरणांचा उदय होवू लागला आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू उद्योजक किरण सामंत आणि भाजपचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे एकत्रित छायाचित्र फलकावर पाहायला मिळाल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या.
उद्योजक किरण सामंत यांच्या समृद्धी फाउंडेशनचे लॉन्चिंग कणकवली पटकीदेवी मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने कणकवली येथे प्रत्यक्ष कार्यक्रमा दरम्यान झाले. यादरम्यान, किरण सामंत व भाजपचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे एकत्रित छायाचित्र फलकावर पाहायला मिळाले. समृद्धी फाउंडेशनच्या निमित्ताने कणकवली शहराच्या “समृद्धी” चा हा नवीन “पॅटर्न” कणकवलीत नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने जनतेसमोर आला आहे.
पटकीदेवी कला- क्रीडा मंडळाच्यावतीने दरवर्षीच नवरात्र उत्सवाचे आयोजन केले जाते. याकरिता दरवर्षी समीर नलावडे मित्र मंडळाचे मोठे योगदान असते. मात्र, यावर्षी या कार्यक्रमांमध्ये बदललेल्या राजकीय समीकरणांचे बदल दिसू लागले आहेत. पटकीदेवी येथे यंदा नवरात्र उत्सव समिती गठीत करण्यात आली असून, या समितीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने बॅनरचे केलेले प्रवेशद्वार यावर देखील नवीन राजकीय समीकरणे जोडलेली पाहायला मिळत आहेत.
बॅनरच्या गेटवर एका बाजूला समीर नलावडे तर दुसरीकडे उद्योजक किरण सामंत यांचे फोटो एकत्र झळकल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्वागताच्या फलकामध्ये राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योजक किरण उर्फ भैया सामंत तर भाजपचे आमदार नितेश राणे व नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे एकाच फलकावर एकत्रित लागलेली छायाचित्रे भविष्यातील राजकीय समीकरणांची झलक दाखवून देणारे ठरत आहेत.
कणकवली नगरपंचायतची थेट नगराध्यक्ष निवडणूक असून, या निवडणुकीच्या निमित्ताने ही नवीन राजकीय समीकरणे जुळवली जात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावर्षी पटकी देवीकडील नवरात्र उत्सवाचे आयोजक म्हणून समीर नलावडे मित्र मंडळ व समृद्धी फाउंडेशन यांच्या वतीने एकत्रित भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने जुळलेल्या राजकीय समिकरणांची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.