मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर ठाकरेंचा थयथयाट, मंत्री उदय सामंतांचे टीकास्त्र
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 27, 2023 06:06 PM2023-04-27T18:06:44+5:302023-04-27T18:07:13+5:30
रिफायनरी प्रकल्पामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गातील लाखो युवकांना रोजगार मिळेल
कुडाळ (सिंधुदुर्ग): रिफायनरी प्रकल्प किती चांगला आहे. तो बारसुला व्हावा असे लेखी पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान यांना लिहीले होते. तेच ठाकरे आता या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. असा टोला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कुडाळ येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरे यांना लगावला. रिफायनरीला जेवढे विरोधक आहेत त्याही पेक्षा जास्त समर्थक आहेत असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक मुख्यमंत्री पाय उतार झालेत, पण मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर तळतळाट व थयथयाट करणारे देशाच्या राजकारणात ठाकरे हे पहीलेच आहेत. मुख्यमंत्री पद गेल्याचे त्यांना खुप दु:ख झाले आहे, त्यांना नैराश्य आले असल्याचा टोला लगावला.
कुडाळ विधानसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आज, गुरुवारी झाली. यावेळी रिफायनरी प्रकल्पाबाबत उदय सामंत यांनी सांगितले की, रिफायनरी प्रकल्पाला नाणार येथे विरोध झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हा प्रकल्प बारसु येथे व्हावा असे लेखी पत्र दि. १२ जानेवारी २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीले. या पत्रात त्यांनी, बारसु येथे कातळ जमीन आहे. हा प्रकल्प कोकणाच्या व महाराष्ट्राच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी प्रदुषण होणार नाही, अशा प्रकारचे अनेक चांगले मुद्दे मांडले होते. आणि आता तेच विरोधात बोलत आहेत.
स्थानिक आमदार साळवीचें समर्थन
रिफायनरीला खासदार विनायक राऊत विरोध करतात. आमदार वैभव नाईक बारसुला जावुन आले ते ही विरोध करतात. मात्र तेथील स्थानिक आमदार राजन साळवी समर्थन करतात. हे काही मला समजले नाही असा ही टोला सामंत यांनी लगावला.
रिफायनरी प्रकल्पामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गातील लाखो युवकांना रोजगार मिळेल. विकासात्मक क्रांती होईल. रिफायनरी विरोधक आहेत त्यापेक्षा समर्थक आहेत. सध्या त्या ठिकाणी केवळ माती परिक्षण सुरू आहे. माती परिक्षणाला नंतरच त्या ठिकाणी प्रकल्प होईल. पण काहींनी तर आता लगेचच प्रकल्प सुरु होईल असा समज केला आहे.