शेतीव्यवसायाशी निगडित उद्योगाला प्राधान्य
By admin | Published: July 9, 2016 09:21 PM2016-07-09T21:21:07+5:302016-07-10T01:38:12+5:30
नाटळ येथील माउली बचतगट : एकीच्या बळाची प्रचिती; जिल्ह्यातील तरुणाईपुढे ठेवला आदर्श
कनेडी : आपला देश शेतीप्रधान आहे. येथे शेतकऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासन विविध प्रयोग करून कृषिक्षेत्रात आमूलाग्र बदल करत आहे. हे ओळखून शेतीला झुकते माप देत नाटळ-राजवाडी येथील महिलांनी एकत्र येत माउली बचतगटाची स्थापना केली. अजूनपर्यंत एकदाही कर्ज न घेता या बचतगटाने भरारी घेतली आहे. गटाच्या माध्यमातून एकीचे बळ
काय असते हे या महिलांनी दाखवून दिले. या गटाच्या अध्यक्षा रेखा सावंत व सचिव सुखदा सावंत यांना पूर्वीपासूनच शेती व्यवसायाची आवड होती. त्यांनी शेती व्यवसायात पतीसोबत शेतात राबत आदर्श शेतकऱ्याचा मानही पटकावलेला आहे. नोकरीनिमित्त शहराकडे धाव घेणाऱ्या तरुणाईला कुठेतरी आळा बसावा या उद्देशाने त्यांनी काही महिलांना एकत्र आणत आपले विचार, आपला उद्देश पटवून सांगितला. महिलाही त्यांच्या मताशी सहमत होत गेल्या आणि १४ जणींचा माउली बचतगट स्थापन झाला. २९ मे २०१४ रोजी स्थापन झालेल्या गटातील महिलांनी शेतीला महत्त्व देत येथील शेतकऱ्यांना भातबियाण्यांची विक्री केली. कारण गरीब कुटुंबातील या महिलांकडे मोठा उद्योग करण्याकरिता आर्थिक भांडवल नव्हते. आर्थिक कुवतीप्रमाणे शेती हंगामास सुरुवात झाल्याने त्यांनी भात बियाण्यांची घरोघरी जाऊन विक्री केली व येथील शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करीत त्यांना मदतीचा हात दिला. या छोटेखानी व्यवसायात थोडा फायदा झाला. त्यातून या महिलांनी गांडूळ खत प्रकल्पाचे स्वप्न पाहिले.
नाटळ राजवाडी हा भाग तसा पाहता पशुपालनास पोषक असा आहे. कारण येथे माळरान असून डोंगरदऱ्यांनी सुजलाम असा हा भाग आहे. या सर्वांची मुबलकता ओळखून महिलांनी शेळी व्यवसाय करण्याचे धाडस केले खरे; परंतु या व्यवसायात जंगली प्राण्यांपासून त्यांना हार पत्करावी लागली. या व्यवसायात तोटा झाल्याने खचून न जाता नव्या दमाने त्यांनी गाई, म्हैशी पाळून दुग्धव्यवसाय चालू केला. या व्यवसायात दुहेरी फायदा झाला. गांडूळ खतासाठी शेण मिळाले. त्याचप्रमाणे घरोघरी दुधाची विक्री केल्याने व्यवसायात चांगला जम बसला. गटातील महिलांचे मनोबल वाढत गेले. व्यवसाय दिवसेंदिवस वृद्धिंगत होत होता. महिलांच्या चेहऱ्यावर आनंदमय झळाळी दिसत होती. आज खऱ्या अर्थाने त्या भक्कमपणे स्वत:च्या पायावर उभ्या होत्या. नोकरीनिमित्त शहराकडे जाण्याची मानसिकता बदलण्याची खरी गरज आहे. इतका तरुण खरोखरच शेती व्यवसायात उत्तुंग भरारी घेऊ शकतो, हे पुन्हा ओळखून हळद लागवड करण्यात आली. प्रायोगिक तत्त्वावर केलेली हळद भरघोस पीक देऊन गेली. शेतीत बऱ्यापैकी बस्तान बसल्याने इतर जोडधंद्यांना सुरुवात केली. यामध्ये त्यांनी लग्न समारंभ, पूजा, गृहप्रवेशसारख्या कार्यक्रमात जेवण बनविण्याची कामे गटामार्फत करू लागल्या. त्याचप्रमाणे गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी सणाला फुलांचे हार बनवून घरोघरी वितरित करण्याची कामे या महिला करू लागल्या. या व्यवसायातून बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता आलेल्या गटातील महिलांनी बेकारी हा एक शत्रू आहे त्याच्याबरोबर कसे लढले पाहिजे, त्यावर कशी मात केली पाहिजे हे लोकांना स्वत:च्या कृतीतून दाखवून दिले.
आपल्याप्रमाणेच गावातील इतर महिलांना बेकारीच्या भस्मासुरापासून वाचविण्यासाठी त्यांनी एकत्रित हळदी-कुंकू, सांस्कृतिक कार्यक्रमातून जनजागृती करून मार्गदर्शन करत समाजसुधारणेचा विडा उचलला होता. महिलांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजनही या गटाच्या माध्यमातून केले जात होते.
अध्यक्ष रेखा सावंत व सचिव सुखदा सावंत यांना त्यांच्या यशाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, माणसाकडे प्रामाणिक, चिकाटी, श्रम करण्याची मानसिकता हे गुण असतील तर कुठलेही शिखर पादाक्रांत केले जाईल. ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळते हे आम्ही सिद्ध करून दाखविले आहे. इथला तरुण नोकरीनिमित्त शहराकडे न जाता येथील शेतीमध्ये हरितक्रांती करून इथेच स्थायिक होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आम्हाला खात्री आहे की, एक ना एक दिवस हे स्वप्न नक्कीच सत्यात उतरेल.
या गटामध्ये उपाध्यक्ष स्नेहा संजय सावंत, गीता गोविंद सावंत, रत्नप्रभा विलास सावंत, साक्षी समीर सावंत, संजना सतीश सावंत, नीता नीलेश सावंत, नीलम नरेंद्र सावंत, श्रेया गुरुदत्त सावंत, सायली सतीश सावंत, रत्नप्रभा सिताराम सावंत, विलासिनी विकास तेली आणि यशोदा महादेव तेली यांचा समावेश आहे. -मिलिंद डोंगरे
सांघिक शेतीला महत्त्व
‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे शेती हा आत्मा समजून सांघिक शेतीवर या महिलांनी भर दिला. सांघिक महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देत या महिलांनी एकमेकांची शेती करून देण्यास सुरुवात केली. यातून वेळ, पैसा, मनुष्यबळाची कमतरता या सर्व समस्यांवर रामबाण उपाय मिळाल्याने शेती व्यवसाय वाढण्यासाठी या महिलांनी कळत-नकळत मदत केली आहे.
डोंगरावर झाडांचे संगोपन
हळद ही बहुगुणी व बहुपयोगी असल्याने तिला सध्या जास्त भाव आहे हे सर्वांनाच समजले. गटाच्या माध्यमातून १ जुलै रोजी जागतिक कृषिदिनानिमित्त येथील डोंगरावर विविध प्रकारची झाडे लावली. या झाडांचे संगोनपही आपण करणार असल्याचे रेखा सावंत यांनी सांगितले.