हापूसच्या आंब्यावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव
By admin | Published: February 9, 2015 01:19 AM2015-02-09T01:19:50+5:302015-02-09T01:21:52+5:30
संमिश्र हवामान : शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
रत्नागिरी : उष्णता, थंडी अशा संमिश्र वातावरणामुळे आंबा पिकावर परिणाम झालेला दिसून येत आहे. आंबा पिकावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असून, सुपारी ते अंड्याच्या आकाराएवढी झालेली फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
यावर्षी थंडी उशिरा सुरू झाल्याने मोहोर प्रक्रियेलाही विलंब झाला. एप्रिलपर्यंत जो आंबा बाजारात येईल, अशी अपेक्षा होती, तोच आंबा गळून पडला आहे. गेल्या आठवड्यापासून थंडी अचानक कमी झाली आहे. शिवाय उकाडा वाढला आहे. त्यामुळे सुपारी ते अंड्याच्या आकाराएवढी झालेली फळे गळून पडली आहेत. शेतकऱ्यांकडून फळांच्या व मोहोराच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करण्यात येते. मात्र, नैसर्गिक प्रकोपामुळे संबंधित खर्च वाया जात असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ६० टक्क्यांपेक्षा अधिक फळांची गळ झालेली दिसून येत आहे.
सध्या सर्वत्र थ्रीप्सचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. सध्या झाडावर जेमतेम २० ते २५ टक्के आंबा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे संबंधित आंबा थ्रीप्सपासून वाचवण्यासाठी शेतकरी मेहनत घेत आहेत. शेवटच्या मोहोराला फळधारणा झाली असली तरी हा आंबा तयार होण्यास मे महिना उजाडणार आहे. त्यामुळे त्याला भाव मिळणे अवघड होणार आहे.
दरवर्षी विविध कारणांनी आंबापीक धोक्यात येऊ लागले आहे. नवीन सरकार स्थापन होऊन सहा महिने लोटले तरी अद्याप आंबा - काजू मंडळाची नव्याने स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितार्थ कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. शेतकऱ्यांच्या आंब्याला योग्य भाग मिळणे अपेक्षित आहे. मँगोनेट ही संकल्पना सुरू करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप संबंधित योजनेविषयी शेतकरी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे संबंधित योजना सुस्पष्ट करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात कृषी विद्यापीठ असताना शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. महागडी औषधे फवारणी करण्याची सूचना केली जात असताना फळगळ किंवा अन्य समस्यांवर मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)