आंब्यावर ‘फांदीमर’चा प्रादुर्भाव
By admin | Published: August 8, 2016 11:16 PM2016-08-08T23:16:17+5:302016-08-08T23:37:14+5:30
बागायतदार चिंतेत : पावसाचे पाणी मुळाशी साचल्याचा परिणाम
प्रथमेश गुरव ल्ल वेंगुर्ले
सातत्याने पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा न होता असे पाणी बऱ्याचअंशी झाडांच्या मुळाजवळ साठून राहते. त्यामुळे मुळे कुजून झाडाच्या फांद्या टोकाकडून वाळल्याने कातळ, कातळसदृश जमिनीवरील आंबा बागांमध्ये ‘फांदीमर’ या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगामुळे आंबा बागायतदारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
फांदी सुकणे, साल काळी पडणे, डिंकासारखा चिकट द्र्रव येऊन फांदी पूर्ण वाळणे ही फांदीमर या रोगाची लक्षणे आहेत. वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राकडून या रोगावर उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
उपाययोजना अशा, फांंदीमर रोगाची लक्षणे दिसल्यास बागायतदारांनी प्रादुर्भित भागाच्या खाली तिरकस काप देऊन फांदी कापावी व त्यावर बोेर्डोपेस्ट किंवा कॉपर आॅक्झिक्लोराइड पेस्ट त्वरित लावावी व रोगग्रस्त फांद्यांचा त्वरित नायनाट करावा.
तसेच पावसाचा अंदाज घेऊन पूर्ण झाडावर एक टक्का बोर्डोमिश्रण किंवा कार्बेन्डिझीम एक ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा कॉपर आॅक्झिक्लोराइड तीन ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. खोडातून डिंक येत असल्यास तो भाग पटाशीने तासून त्यावर बोर्डोपेस्ट लावावी. अशा बागांमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला बुरशीजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शेणखताबरोबर ट्रायकोडर्मा जैविक बुरशीचा वापर २०० ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात करावा. तसेच बऱ्याच वेळा झाडाला बोरॉन, झिंक अशा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासल्यास फांदीमधून डिंक येण्याची लक्षणे दिसून आल्यास डोलोमाईटचा वापर
दोन किलो प्रतिझाड याप्रमाणे केल्यास डिंक येण्याचे प्रमाण कमी होते. (प्रतिनिधी)
काही आंबा बागांमध्ये खवले किडीचासुद्धा प्रादुर्भाव दिसून येत आहे. एवढ्या जास्त पावसात ही कीड बागेमध्ये टिकून आहे. खवले किडीचे दोन प्रकार आढळतात. या किडीच्या नियंत्रणासाठी पावसाची उघडीप बघून अॅसफेट पावडर एक ग्रॅम प्रतिलिटर किंवा क्लोरोपायरिफॉस २0 ई.सी. व डायक्लोरोव्हॅस ७0 ई. सी. एक मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात झाडावर फवारणी करावी.
- डॉ. पी. सी. हळदवणेकर
संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र