अपक्षांचा प्रभाव सर्वच पक्षांची डोकेदुखी

By admin | Published: November 9, 2016 11:09 PM2016-11-09T23:09:50+5:302016-11-09T23:09:50+5:30

नाराजांबरोबरच अपक्षांची समजूत काढणे गरजेचे : थेट नगराध्यक्षपदासाठी अनेकजण मैदानात

Influencers affect all the sides | अपक्षांचा प्रभाव सर्वच पक्षांची डोकेदुखी

अपक्षांचा प्रभाव सर्वच पक्षांची डोकेदुखी

Next

 
अनंत जाधव ल्ल सावंतवाडी
नगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार उभे राहिल्याने हे उमेदवार सर्वच पक्षांना डोईजड होणार आहेत. कारण काही प्रभागात अपक्षांचा मोठा प्रभाव आहे. या निवडणुकीत अनेकांची उमेदवारी ही पक्षानेच नाकारल्याने निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत, तर काहीजण समाजसेवेचे व्रत म्हणून मैदानात उभे ठाकले आहेत. त्यामुळे एखाद्या उमेदवाराला जर विजयासाठी काठावरचे बहुमत हवे असल्यास ती मते अपक्ष सहज खिशात घालून पक्षाच्या उमेदवाराला विजयापासून लांब ठेवू शकतात त्यामुळे अपक्ष उमेदवार सर्वच पक्षांसाठी धोक्याची घंटा बनले आहेत.
सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत प्रथमच अपक्ष उमेदवारांनी डोके वर काढले आहे. प्रत्येक प्रभागात अपक्षांनी आपली मोट बांधली आहे. यात प्रभाग ५ तर आघाडीवर आहे, तर काही ठिकाणी दोन ते तीन उमेदवार उभे राहून काही मते पदरात पाडून घेण्याचे काम करीत आहेत. यात प्रभाव असलेले अपक्ष हे प्रभाग १ , प्रभाग ५ याचबरोबर प्रभाग ३ मध्येही आपले नशीब आजमावत आहेत.
प्रभाग १ मध्ये माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी बंडखोरी केली आहे. ते सामाजिक कार्यात असल्याने त्यांची जनतेशी नाळ जुळली असल्याची चर्चा आहे. स्वराज संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विकासकामेही केली आहेत. त्याशिवाय शिल्पा केसरकर, अनिता भाईडकर, आदींचाही प्रभागात चांगला प्रभाव आहे. प्रभाग ७ मधून राजू पनवलेकर यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक निवडणुका लढविल्या असून, त्यांचा प्रभाग असलेल्या वैश्यवाडा आणि चितारआळी परिसरात प्रभाव आहे.
प्रभाग ५ मध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या सर्वांत जास्त आहे. काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने अरुण भिसे, वैष्णवी ठोंबरे, साक्षी वंजारी आदींनी, तर भाजपने उमेदवारी नाकारल्याने अन्नपूर्णा कोरगावकर यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. याशिवाय सीमा मठकर, गुरुदत्त गवडंळकर, परिशीत मांजरेकर, आदींनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या प्रभागात मोठ्या प्रमाणात मतांची विभागणी होणार आहे. हा प्रभाग तर सर्व पक्षांना धक्का देणारा असून, एका-एका मतासाठी उमेदवाराला झगडावे लागणार आहे. त्यामुळे विजयाचा अंदाज कोणीच कुणाचा देऊ शकणार नसल्याचे दिसून येत आहे.
प्रभाग ६ मध्येही सर्वच पक्षांना तुल्यबळ लढत अपक्षांची आहे. विद्यमान नगरसेवक सुदन्वा आरेकर यांच्यासह शरद जामदार यांनी निवडणूक लढविण्याचे ठरविल्याने याचा चांगलाच फटका शिवसेनेला बसण्याची दाट शक्यता असून, त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सध्या शिवसेनेकडून सुरू झाले आहेत. या प्रभागात अपक्ष उमेदवारांनी सर्व पक्षांची कोंडी केली आहे.
तसाच प्रकार नगराध्यक्ष निवडणुकीतही केला जात आहे. यावेळी प्रथमच नागरिकांतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे अनेक अपक्ष उमेदवारांनी थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीच अर्ज दाखल केला आहे. यातील बहुतांश उमेदवारांनी आपला प्रचारही सुरू केला आहे. नगराध्यक्षपदासाठी अ‍ॅड. बापू गव्हाणकर यांनी अर्ज दाखल केला आहे. ते पूर्वीपासून समाजसेवेत अग्रेसर असून, अनेकवेळा सावंतवाडीच्या सर्व चळवळीत त्यांनी सहभाग नोंदविला आहे. शहरवासीयांसाठी मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख आहे.
विद्यमान उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आपला अर्ज मागे घेण्याचे संकेत दिले असले तरी जर उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला त्याचा मोठा फटका बसणार आहे. पोकळे यांच्यामुळे मतांचे विभाजनही होऊ शकते. राजन पोकळेंचा प्रभाव मतदारांत असल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी शिवसेनेला जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत.
प्रसाद पावस्कर हे समाजवादी विचारसरणीचे असून, श्रीराम वाचन मंदिर तसेच बांदा अर्बनच्या माध्यमातून त्यांनी काम केले आहे. अनेकांना त्यांनी रोजगारही दिला आहे. भाजपने तिकीट नाकारल्याने अन्नपूर्णा कोरगावकर यांनीही नगराध्यक्ष-पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे.
माजी नगरसेवक सुनील पेडणेकर नगराध्यक्षाच्या स्पर्धेत आहेत. अपक्ष उमेदवार किती मते घेतात, त्यावर सर्वच पक्षांचे भवितव्य अवलंबून असून, अपक्षांनी जर मोठ्या प्रमाणात मते घेतली, तर त्याचा फटकाही पक्षाच्या उमेदवारांना बसू शकतो.
प्रभाग पाचमध्ये सात अपक्ष
सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत मोठ्या संख्येने अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत ते प्रभाग ५ मधून. या प्रभागातून तब्बल सात अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने मतदार राजा कुणाच्या पारड्यात आपला कौल टाकतो, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याशिवाय काँग्रेसबरोबरच भाजप व शिवसेनेचे उमेदवार या मतदारसंघातून आपले नशीब आजमावित आहेत.

Web Title: Influencers affect all the sides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.