उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या १२ जादा बसेस- प्रकाश रसाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:45 AM2019-04-17T11:45:59+5:302019-04-17T11:51:42+5:30
पर्यटन हंगाम आणि शाळांना सुट्टी पडल्याने प्रवाशांच्या मागणीनुसार १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी १२ जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई-सिंधुदुर्ग अशा ३ बसेस नियमितपणे सुरू असून एकुण १५ बसेस चाकरमान्यांच्या सेवेत
कणकवली :पर्यटन हंगाम आणि शाळांना सुट्टी पडल्याने प्रवाशांच्या मागणीनुसार १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी १२ जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई-सिंधुदुर्ग अशा ३ बसेस नियमितपणे सुरू असून एकुण १५ बसेस चाकरमान्यांच्या सेवेत असणार आहेत. महाराष्ट्र परिवहन विभागाच्या बसेसचे बुकींग आॅनलाईन करण्याची संधी प्रवाशांना आहे. ग्रामीण भागातही वाढत्या भारमानानुसार जादा बसेस सोडण्यात येतील़ दररोजच्या मुख्य चार मार्गांवर जादा बसेस सोडण्यात आल्याची माहिती एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली़
कणकवली येथिल विभागीय कार्यालयात प्रकाश रसाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी अभिजित पाटील उपस्थित होते. प्रकाश रसाळ म्हणाले, उन्हाळी हंगाम हा चाकरमानी आणि पर्यटकांसाठी महत्वपुर्ण आहे. त्या दृष्टीने एसटी प्रशासनाने पुढील दोन महिन्यांचे नियोजन केले आहे. विविध मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये कुडाळ-विजापूर २ बसेस, पणजी-निगडी, पणजी-अक्कलकोट, कणकवली-बोरिवली, देवगड-बोरिवली, कुडाळ-बोरिवली, मालवण - निगडी, कणकवली-बेळगाव तसेच रत्नागिरी, इचलकरंजी, गणपतीपुळे, कोल्हापूर या चार लांबपल्याच्या मार्गावर जादा बसेस भारामानानुसार सोडण्यात आल्या आहेत. या बसेसमध्ये लोकसभा निवडणुकीकरता २४० गाड्या आरक्षित करण्यात आल्यामुळे २२ व २३ एप्रिल रोजी काही प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता असल्याचे प्रकाश रसाळ यांनी सांगितले़ .
सध्या नियमित विजयदुर्ग-मुंबई, मालवण-मुंबई, देवगड-बोरिवली या तीन गाड्या सुरू आहेत़. तसेच नवीन १२ बसेसची सुरूवात करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गात सावंतवाडी-कणकवली, कणकवली-देवगड, मालवण-कुडाळ, कुडाळ-सावंतवाडी या मार्गावर वाढीव भारमानाची आकडेवारी घेऊन सध्या जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. लग्न समारंभासाठी एप्रिलमध्ये १० गाड्या, मे मध्ये १३ गाड्या आणि जून मध्ये १५ गाड्या बुकींग करण्यात आल्या आहेत़ आतापर्यंत ३८ दिवसांचे बुकींग लग्न समारंभासाठी करण्यात आल्याचे अभिजित पाटील यांनी यावेळी सांगितले.तर एसटी च्या या सेवेचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशानी घ्यावा असे आवाहन प्रकाश रसाळ यांनी केले आहे.