सिंधुदुर्गसह कोल्हापुरात ९ रानटी हत्तींचे वास्तव्य, उपवनसंरक्षक चव्हाण यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 01:08 PM2019-06-05T13:08:19+5:302019-06-05T13:10:30+5:30
सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात सध्या रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला असला तरी जिल्ह्यात हत्ती हटाव मोहिमेचे नियोजन नाही. तसेच सिंधुदुर्गसह कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ९ रानटी हत्ती वास्तव्यास आहेत. यात दोन पिल्ले आहेत. कर्नाटक येथील हत्ती पूर्ण प्रशिक्षित झाला असून त्याच्यासह अन्य दोन अशा एकूण तीन हत्तींना ताडोबा अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सध्या रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला असला तरी जिल्ह्यात हत्ती हटाव मोहिमेचे नियोजन नाही. तसेच सिंधुदुर्गसह कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ९ रानटी हत्ती वास्तव्यास आहेत. यात दोन पिल्ले आहेत. कर्नाटक येथील हत्ती पूर्ण प्रशिक्षित झाला असून त्याच्यासह अन्य दोन अशा एकूण तीन हत्तींना ताडोबा अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी दालनात लोकशाही दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. टी. जगताप उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांना जिल्ह्यात रानटी हत्तींनी घातलेल्या धुमाकुळाबाबत विचारत त्यांच्या बंदोबस्तासाठी कोणते नियोजन करण्यात आले आहे का ? असा प्रश्न केला असता त्यांनी हत्ती हटाव मोहिमेचे नियोजन नसल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी अलीकडे या हत्तींचा उपद्रव वाढला आहे. नुकसानी मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून सुरु असल्याचे मान्य केले. बंदोबस्तासाठी कोणते नियोजन नसले तरी नुकसानी वाटप आम्ही ३० दिवसांत करीत आहोत, एवढाच दिलासा नुकसानग्रस्तांना सध्यातरी आम्ही देत आहोत. आतापर्यंत १८३६ बाधित कुटुंबाना एक कोटी ४ लाख रुपये रक्कम वाटप करण्यात आली आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
यापूर्वी चारवेळा हत्ती हटाव मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी तीन हत्ती पकडण्यात आले. त्यातील दोन हत्ती मृत झाले. एक हत्ती कर्नाटक येथे प्रशिक्षण घेत आहे. यासाठी वर्षाला जिल्हा प्रशासन १० लाख रुपये खर्च करीत आहे. यात माउताचे मानधन व इतर खर्च आहे.
कर्नाटक येथील हत्ती पूर्ण प्रशिक्षित झाला असून त्याच्यासह अन्य दोन अशा एकूण तीन हत्तींना ताडोबा अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याचे यावेळी चव्हाण यांनी सांगितले.
तसेच नरेंद्र डोंगरावर रानटी जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. त्याठिकाणी कॅमेरा बसविण्यात आला होता. त्या कॅमेऱ्यात १५ गवे असल्याचे कैद झाले असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
हत्ती बदला घेतो
हत्तींनी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे अशांना ३0 दिवसांच्या आत सेवा हमी कायद्यांतर्गत एनईएफटीच्या माध्यमातून पैसे खात्यात जमा केले जातात. हत्तींची धरपकड करणाऱ्या व्यक्तीला हत्ती बरोबर ओळखून त्याच्या बागेचे नुकसान करतो, असे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी सांगत दोडामार्ग येथील एका बागायतदार शेतकऱ्याचे उदाहरण दिले. या शेतकऱ्याने हत्तीला धरपकड करत जंगलात हुसकावून लावले होते. त्यानंतर या हत्तीने त्या शेतकऱ्यांच्या बागेची नासधूस केली. मात्र बाजूला अन्य शेतकऱ्यांच्या बागा होत्या त्याला साधे स्पर्शही केले नाही.
दोन पिल्लांचा जन्म झाला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी सात हत्तींचा वावर होता. मात्र सप्टेंबर व नोव्हेंबर २0१८ या दरम्यान दोन पिल्लांचा जन्म झाला. त्यानंतर ही संख्या ९ वर गेली. आता सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यात ९ हत्ती आहेत. या दोन जिल्ह्यात हत्ती ये-जा करत असतात.