नऊ रुग्णांना इंजेक्शनची बाधा
By admin | Published: April 17, 2015 11:34 PM2015-04-17T23:34:34+5:302015-04-18T00:03:10+5:30
रुग्ण अत्यवस्थ : कुडाळ रुग्णालयातील घटना
कुडाळ : कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या नऊ रुग्णांना इंजेक्शनची बाधा झाली असून, हे सर्व रुग्ण अत्यवस्थ आहेत. यातील एका रुग्णाला उपचारासाठी कुडाळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आता हा रुग्ण चांगल्या स्थितीत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. डी. वजराटकर यांनी दिली. ही घटना गुरुवारी रात्री ८च्या सुमारास घडली. या औषधांच्या तपासणीची मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.
कुडाळ ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारचे सुमारे ४० रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारी रात्री साडेसात वाजता सर्व प्रकारच्या रुग्णांना जंतू संसर्ग होऊ नये, याकरिता दररोजप्रमाणे जंतू संसर्ग प्रतिजैवक इंजेक्शन देण्यात येत होते. साडेसात वाजेपर्यंत नऊ रुग्णांना इंजेक्शन देऊन झाली असता यातील काही रुग्णांना थंडी-ताप, डोकेदुखी ही लक्षणे दिसू लागली व या नऊ रुग्णांची तब्येत ढासळली.
इंजेक्शन देऊन झाल्यावर अर्ध्या तासातच या इंजेक्शनमुळे पेशंटना त्रास जाणवू लागला. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये घबराट पसरली. या रुग्णांमध्ये नऊ वर्षांच्या मुलापासून ७० वर्षांच्या वृद्धेचाही समावेश होता. इंजेक्शनचा त्रास जाणवू लागल्याचे लक्षात येताच येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांंनी अॅलर्जी होऊ नये, याकरिता तातडीने उपचार सुरू केले.
एक रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल
नऊपैकी अलीमुद्दिन खान (वय ५८, रा. नेरूर) यांची प्रकृती गंभीर बनत चालली असल्याने त्यांना तत्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ताप, सर्दी, शस्त्रक्रिया, प्रसुती झालेल्या माता अशा सर्व रुग्णांना जंतूसंसर्ग होऊ नये, याकरिता प्रतिजैवक औषध म्हणून सिफोट्यॅगझिम’ हे इंजेक्शन दिले जाते. याही ठिकाणी रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येत होते. या इंजेक्शनमुळेच रुग्णांना त्रास जाणवू लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.
त्रास झालेल्या रुग्णांची नावे
नसरीन मुजावर (वय ३८, पिंगुळी), साकील मुजावर (१२, नेरूर), सखाराम नाईक (६७, केरवडे), प्रमिला चव्हाण (२२, पिंगुळी), सत्यवती चव्हाण (४७, हिर्लोक), अश्विनी पिंगुळकर (२०, मांडकुली), प्रमिला नेरूरकर (४५, नेरूर), अलामुद्दिन खान (५८, नेरूर), महादेव सावंत (५५, पोईप)
तपासणी होणे गरजेचे
ही इंजेक्शन महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा रुग्णालय व नंतर ग्रामीण रुग्णालयात आली आहेत. कुडाळ ग्रामीण रुग्णालयात १४ सप्टेंबर २०१४ रोजी आलेल्या या इंजेक्शनपैकी ३५५० इंजेक्शने शिल्लक आहेत. या इंजेक्शनबरोबरच जिल्ह्यातील तसेच राज्यातील इंजेक्शनची तपासणी होणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
व्यक्तीने हाताने पावडर भरली असावी : वजराटकर
इंजेक्शनमधून अशा प्रकारचा त्रास होणे, ही दहा वर्षांतील पहिलीच घटना आहे. इंजेक्शन बनविणाऱ्या कंपनीमधील एखाद्या कामगाराने जर का हाताने इंजेक्शनची पावडर भरल्यास जंतूसंसर्ग होण्याची शक्यता डॉ. वजराटकर यांनी वर्तविली. या इंजेक्शनमुळे त्रास जाणवू लागल्याने आता या इंजेक्शनचा वापर योग्य तपासणी अहवाल येईपर्यंत बंद करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. वजराटकर यांनी दिली.
इंजेक्शन तपासणीकरिता मुंबईला
हे इंजेक्शन जंतूसंसर्ग होऊ नये, म्हणून आम्ही देतो. मात्र, शुक्रवारी रात्री रुग्णांना त्रास झाला. यामुळे हे इंजेक्शन तसेच त्यावेळी वापरण्यात आलेल्या सीरिंज व इतर वस्तू सीलबंद करून येथील फूड अॅण्ड कार्पोरेशनकडे तपासणीसाठी मुंबईला पाठविल्याची माहिती कुडाळचे वैद्यकीय अधिकारी पी. डी. वजराटकर यांनी दिली.