निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु
By admin | Published: March 3, 2015 09:24 PM2015-03-03T21:24:21+5:302015-03-03T21:57:03+5:30
तंटामुक्त समिती : गावात राजकारण न आणण्यावर एकमत
मेहरून नाकाडे -रत्नागिरी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राजकारण न करता बिनविरोध निवडणुका लढवण्यासाठी कळझोंडी गावातील तंटामुक्त समितीची धडपड सुरू झाली आहे. तंटामुक्त समितीच्या प्रयत्नाला यश येत असून, तीन वॉर्ड पैकी दोन वॉर्डमध्ये बिनविरोध निवडणुका होण्यासाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. तर एका वॉर्डमध्ये बोलणी सुरू असून, संबंधित वॉर्डमध्येही यश येण्याची शक्यता आहे.बारा वाड्यांतंर्गत १७७५ लोकवस्तीचे कळझोंडी गाव रत्नागिरी पासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. २३ फेब्रुवारी १९५७ साली ग्रामपंचायतीची स्थापना झाली तेव्हापासून ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध होत होत्या. गावपॅनलचे त्यावर वर्चस्व होते. मात्र २००५ साली निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर २०११मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. दोन टर्म निवडणुका घेण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा गावात कोणतेही राजकारण न करता विकासकामासाठी इच्छूक उमेदवारांना संधी देण्यासाठी बहुमतांने निवडून आणण्याचे ठरवण्यात आले आहे. परजासत्ताक दिनादिवशी झालेल्या तंटामुक्त समितीच्या बैठकीत ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुकीचा विषय मांडण्यात आला होता. दि. ४ फेब्रुवारीच्या बैठकीत ठराव मांडण्यात आला होता.निवडणुका बिनविरोध करण्याची कारणे मांडण्यात आली आहेत. शिवाय ज्यांना निवडणुका हव्या आहेत, त्यांचेकडून बिनविरोधासाठीची कारणे मागवण्यात आले आहेत. परंतु, तंटामुक्त समिती निर्विवादपणे बिनविरोध निवडणुका होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ग्रामस्थांचेही सहकार्य लाभत आहे. त्यामुळे गावात तंटा नावालाही उरलेला नाही. उलट या मोहिमेला ग्रामस्थांचाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
प्लास्टिक निर्मूलन राबवत असताना गावात कापडी पिशव्यांचे वाटप नागरिकांना करण्यात आले आहे. गेल्या २५ वर्षांपासून गावात दारूबंदी करण्यात आली आहे. ग्रामसुरक्षा दल कार्यरत असून गावात शांतता, सुव्यवस्था नांदत आहे. २००७ पासून तंटामुक्त अभियानामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग असून, २०१२-१३ मध्ये गावाला तंटामुक्त पुरस्कारदेखील प्राप्त झाला आहे. पुरस्काराच्या रक्कमेचा विनियोग सामाजिक, विकासात्मक कार्यक्रम तंटामुक्त अध्यादेशाप्रमाणे करण्यात आला आहे.
- व्ही. एन. जाधव,
ग्रामसेवक, ग्रामपंचायत कळझोंडी.
समाजसेवेस इच्छूक असणाऱ्यांना संधी
जिल्हा परिषद, पंचायत समित्या असो वा विधानसभा, लोकसभा निवडणूका. यावेळी असणारे राजकारण ठीक आहे. परंतु गावाच्या विकासात कोणतेही राजकारण न आणण्याचे ठरविण्यात आले आहे. समाजसेवेसाठी मनापासून इच्छूक असणाऱ्यांना यावेळी संधी देण्यात येणार आहे. मी यावर्षी स्वत: इच्छूक नसून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे ठरवण्यात आले आहे. निवडणुकांशिवाय बहुमताने गावपॅनेलची सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला नक्कीच यश येईल.
- रवींद्र वीर,
सरपंच, ग्रामपंचायत कळझोंडी
बिनविरोधसाठी शंभर टक्के प्रयत्न
गावामध्ये तीन वॉर्डसाठी प्रत्येकी दोन जागेवर उमेदवार उभे करण्यात येतात. दोन वॉर्डमध्ये बिनविरोध निवडणूकांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. उर्वरित एका वॉर्डमध्ये चर्चा सुरू असून तेथील बहुमत लवकरच जाहीर करण्यात येईल. गाव विकासाठी, कोणतेही राजकारण न आणता, तसेच गावातील वातावरण गढूळ न करता, शिवाय पैशांचा अपव्यय होऊ नये, यासाठी बिनविरोध निवडणुकीसाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
- दीपक शिंदे,
अध्यक्ष, तंटामुक्त समिती.