कुडाळात खड्डे बुजविण्यास सुरू, नगरपंचायतीकडून पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 02:25 PM2018-09-04T14:25:37+5:302018-09-04T14:33:22+5:30
कुडाळ नगरपंचायतीने ताब्यात घेतलेल्या अभिमन्यू हॉटेल ते काळपनाका या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरूवात केली आहे.
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीने ताब्यात घेतलेल्या अभिमन्यू हॉटेल ते काळपनाका या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरूवात केली आहे.
कुडाळ नगरपंचायतीने काळपनाका ते अभिमन्यू हॉटेलपर्यंतचा रस्ता ताब्यात घेतला. या रस्त्यावर पडलेले खड्डे एप्रिल-मे महिन्यात बुजविण्यात आले. मात्र पावसाळ्यात काही ठिकाणी भले मोठे खड्डे पडले.
कुडाळ पंचायत समितीसमोर तर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. खड्ड्यांतून वाहन चालविताना त्रास होत होता. वाहनचालकांचा त्रास कमी व्हावा म्हणून चिऱ्यांची करपा घालून खड्डे बुजविण्यास सुरूवात केली. मात्र त्याठिकाणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन खड्डे बुजविण्यास विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता.
नगरपंचायतीच्या सभेत हा विषय गाजला. यावेळी मुख्याधिकारी देवानंद ढकळे यांनी चतुथीपूर्वी खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्याप्रमाणे ठेकेदार एन. बी. तावडे यांच्यासोबत मुख्याधिकारी देवानंद ढकळे, शिवसेनेचे गटनेते बाळा वेंगुर्लेकर, सेनेचे नगरसेवक गणेश भोगटे यांनी खड्ड्यांची पाहणी केली होती.
आज कुडाळ पंचायत समिती समोरील खड्डे बुजविण्यास सुरूवात केली. यावेळी नगराध्यक्ष विनायक राणे, नगरसेवक गणेश भोगटे, राकेश कांदे उपस्थित होते.