सावंतवाडीतील जखमी बेकरी व्यावसायिकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 03:38 PM2019-12-03T15:38:53+5:302019-12-03T15:41:12+5:30
रस्त्यावरील गतिरोधकांचा अंदाज न आल्याने पत्रादेवी-बांदा सीमेवर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले सावंतवाडी येथील प्रसिद्ध बेकरी व्यावसायिक केरोबिन डिसोझा (६०) यांचे सोमवारी सकाळी गोवा येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
सावंतवाडी : रस्त्यावरील गतिरोधकांचा अंदाज न आल्याने पत्रादेवी-बांदा सीमेवर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले सावंतवाडी येथील प्रसिद्ध बेकरी व्यावसायिक केरोबिन डिसोझा (६०) यांचे सोमवारी सकाळी गोवा येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
केरोबिन हे गोव्यातील नातेवाईकाचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी एकटेच दुचाकीने गेले होते. नातेवाईकांना भेटून सावंतवाडीकडे परतत असताना सायंकाळी ४ वाजता पत्रादेवी-बांदा रस्त्यावरील गतिरोधकांचा अंदाज न आल्याने त्यांच्या दुचाकीला अपघात झाला होता. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले होते. उपचारांना त्यांनी काहीसा प्रतिसाद दिला होता. मात्र, सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
केरोबिन यांचा सावंतवाडीत गेल्या अनेक वर्षांपासून बेकरी व्यवसाय आहे. केरोबिन पाव म्हणून त्यांच्या पावाला पसंती होती. येथील मच्छिमार्केट रस्त्यावर सिमॉन बेकरीच्या माध्यमातून ते व्यवसाय करीत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावई, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. त्यांचा मृतदेह दुपारी सावंतवाडीत आणण्यात आला. यावेळी सावंतवाडी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
कोकिसरेतील महिलेचा कणकवलीत मृत्यू
कणकवली : वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे-कुंभारवाडी येथील सविता सोनाजी खेडेकर (३५) यांना अत्यवस्थ स्थितीत उपचारासाठी सोमवारी सायंकाळी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना दोन दिवसांपूर्वी ताप येत होता.
कोकिसरे-कुंभारवाडी येथील सविता खेडेकर यांना दोन दिवसांपूर्वी ताप येत होता. त्यांच्यावर वैभववाडी येथील खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना उपचारासाठी वैभववाडी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथून अधिक उपचारासाठी सायंकाळी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपजिल्हा रूग्णालयात दाखल करीत असताना त्यांची प्रकृती गंभीर झाली. सायंकाळी ४.५० वाजता त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा रक्त नमुना तपासणी अहवाल लेप्टो निगेटिव्ह आला होता. सविता खेडेकर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.