अंगणवाडी आहार पुरवठादाराची चौकशी करा : दुर्वा खानविलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 03:59 PM2020-09-05T15:59:07+5:302020-09-05T16:02:09+5:30
शासनाकडून अंगणवाडीतील बालकांसाठी दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, असा आरोप करीत पुरवठादाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती दुर्वा खानविलकर यांनी मासिक सभेत केली.
वैभववाडी : शासनाकडून अंगणवाडीतील बालकांसाठी दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, असा आरोप करीत पुरवठादाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती दुर्वा खानविलकर यांनी मासिक सभेत केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीची सभा झूम अॅपवर झाली. या सभेला सभापती अक्षता डाफळे, उपसभापती दुर्वा खानविलकर, पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे, लक्ष्मण रावराणे, हर्षदा हरयाण, गटविकास अधिकारी विद्या गमरे, सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांची आॅनलाईन उपस्थिती होती.
तालुक्यातील अंगणवाड्यांमार्फत लहान बालकांच्या पोषणासाठी आहार दिला जातो. यामध्ये विविध प्रकारची कडधान्ये, तेल आदींसह विविध वस्तूंचे कीट असते. परंतु सध्या दिला गेलेला आहार हा निकृष्ट आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून पुरवठादारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खानविलकर यांनी केली. यावेळी महिला बालविकास विभागाच्यावतीने चौकशी करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
कोरोनाच्या काळातील वीज बिले वाढीव आली आहेत. या बिलांमध्ये ग्राहकांना काही सवलत मिळणार आहे का? असा सवाल करीत वीज बिले भरायची की नाहीत? अशी विचारणा सदस्य रावराणे यांनी केली. त्यावेळी उपअभियंता जयकुमार कथले यांनी शासनाकडून यासंदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारच्या सूचना प्राप्त नसल्याचे सांगितले.
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. यापैकी अनेक शेतकऱ्यांच्या भातशेतीचा विमा आहे. त्यांना भरपाई मिळणे आवश्यक आहे. कृषी विभागाने कोणती कार्यवाही केली? असे रावराणे यांची विचारले असता तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे स्पष्ट केले.
ओरोस येथून अहवाल येण्यास विलंब
कोविड सेंटर आणि विलगीकरण कक्षामध्ये नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दोन्ही ठिकाणी अस्वच्छता आहे. वेळोवेळी सांगूनही त्यामध्ये कोणतीच सुधारणा झालेली नाही. याशिवाय तालुक्यातील कोरोना अहवाल उशिरा येत असल्याचा मुद्दा रावराणे यांनी उपस्थित केला. त्यावर ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. नवनाथ कांबळे यांनी कोविड सेंटरमध्ये दररोज स्वच्छता केली जाते. कोरोना तपासणीसाठी घेतलेले स्वॅब इथून वेळेत ओरोसला जातात; परंतु तेथूनच अहवाल येण्यास विलंब होतो. ओरोस लॅबमध्ये रुग्ण आढळल्याने हा प्रकार घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामसेवकाला नोटीस द्यावी : रावराणे
तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ७० असून सक्रिय रुग्णांची संख्या ३९ आहे. ३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी सभेत दिली. तिरवडेतर्फ सौंदळ सरपंचांना विलगीकरणावरून झालेल्या त्रासाला ग्रामसेवक जबाबदार आहेत. त्या ग्रामसेवकाला नोटीस द्यावी, अशी मागणी रावराणे यांनी केली.
कुसूर येथील अतिक्रमण हटवा
कुसूर बाजारवाडी येथून मुख्य रस्त्यापासून ग्रामपंचायतीकडे जाणारा मार्ग जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. मात्र, त्या मार्गावर अतिक्रमण करण्यात आले असल्याने रहदारीस बंद झाला आहे. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी अरविंद रावराणे यांनी सभेत केली.